शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे स्वाभिमानी नेते अॅड.वामनराव चटप यांनी लोकसभा निवडणुकीसाठी डोक्यावर ‘आप’ची टोपी चढविल्याने संघटनेतील निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठी फळी नाराज झाली आहे. संघटनेतील या निष्ठावंतांची नाराजी दूर करण्यासोबतच ‘आप’च्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्याचे कठीण आवाहन अॅड. चटप यांच्यासमोर आहे.
शरद जोशी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा एक निष्ठावंत कार्यकर्ता अशी अॅड. वामनराव चटप यांची ओळख आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघात प्रभाकर मामुलकर यांचा पराभव करून अॅड. चटप यांनी राज्याची विधानसभा गाजवली. गरीब शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा लढवय्या नेता, अशी त्यांची ओळख आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आजवर विविध आंदोलने, बैठा सत्याग्रहासोबतच अनेक नाविन्यपूर्ण आंदोलन सुध्दा केली. २००९ ची लोकसभा निवडणूक त्यांनी स्वतंत्र भारत पक्षाकडून लढविली आणि तब्बल १ लाख ६९ हजार मते घेतली. गेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता त्यांनी तेव्हापासूनच नव्या जोमाने कामाला सुरुवात केली.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या माध्यमातून अॅड. चटप यांचे आंदोलन व जनसंपर्क सुरू असतानाच केवळ लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी ‘आप’ची टोपी चढविल्याने संघटनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठी फळी नाराज झाली आहे. चटप यांना आपची टोपी चढवायचीच होती, तर त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात का घेतले नाही, असा प्रश्नही आता शेतकरी संघटनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांकडून त्यांना विचारला जात आहे, तर नव्यानेच स्थापन झालेल्या ‘आप’ला या जिल्ह्य़ात प्रतिथयश चेहरा नसल्याने व कुठलीही योग्यता नसलेल्या काही युवकांच्या हाती या पक्षाची सूत्रे असल्याने प्रचार करतांना बरीच कसरत करावी लागणार आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ातील राजुरा, वरोरा विधानसभा मतदारसंघासोबतच यवतमाळ जिल्ह्य़ातील आर्णी व वणी विधानसभा मतदारसंघात शेतकरी संघटनेचे वर्चस्व आहे. गेल्या वेळी येथूनच चांगले मतदान झाले, परंतु आता आपची टोपी घातल्याने संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबतच पारंपरिक मतदार त्यांच्यावर नाराज आहेत. ही नाराजी दूर करायची असेल तर त्यांना परिश्रम घ्यावे लागणार, असे विश्लेषकांचे मत आहे.
या लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर आप पक्षाला पाहिजे तसा प्रतिसाद नाही. चंद्रपूर वगळता इतर विधानसभा मतदारसंघा तर आपकडे कार्यकर्ते सुध्दा नाहीत. त्यामुळे मतदान केंद्रावरील बुथवर बसण्यासाठी कार्यकर्ते शोधण्यापासून तर प्रचाराची धुरा सांभाळण्यापर्यंतची सर्व जबाबदारी चटप व त्यांच्या सहकाऱ्यांना पार पाडावी लागणार आहे. विधानसभा मतदारसंघासाठी या सर्व गोष्टी शक्य असल्या तरी लोकसभा मतदारसंघा त्या मानाने बरेच मोठे असल्याने त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. अॅड.चटप कुणबी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. या लोकसभा मतदारसंघात कुणबी समाजाची सहा लाखावर मते आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी केवळ कुणबी हा एकमेव जातीय मुद्दा पकडून प्रचार केला होता. जातीय समीकरणाचा विचार केला तर चटप यांना २००९ ची लोकसभा अतिशय सोपी होती, परंतु या मतदारसंघात जातीय समीकरण जुळून येत नाही, हा आजवरचा इतिहास आहे. त्याचा अनुभव त्यांना सुध्दा आलेला आहे. चटप यांच्या प्रचाराला सुरुवात झाली असली तरी त्यांचा संपूर्ण वेळ संघटनेतील नाराज कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळण्यात जात आहे, तर आपच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना सुध्दा नाराज करून चालणार नाही. त्यामुळे संघटनेचे निष्ठावंत व आपचे उत्साही कार्यकर्ते या दोघांची मर्जी सांभाळत चटप यांची लोकसभा निवडणुकीची घोडदौड सुरू आहे.
अरविंद केजरीवाल यांची आज जाहीर सभा
आम आदमी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल उद्या, १३ मार्चला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी भव्य रोड शो व चांदा क्लब ग्राऊंडवर जाहीरसभा होणार आहे. सकाळी ११ वाजता केजरीवाल यांचे चंद्रपुरात आगमन होईल. यावेळी ते जनता महाविद्यालयासमोरील आपच्या कार्यालयाला भेट देतील. याच कार्यालयातून रोड शो व रॅली काढण्यात येईल. ही रॅली जनता महाविद्यालय, वरोरा नाका, बस स्थानक, प्रियदर्शिनी चौक, जटपूरा गेट, कस्तुरबा मार्गे गिरनार चौक, गांधी चौक, मुख्य मार्गाने जटपूरा गेट येथून चांदा क्लब ग्राऊंडवर पोहोचेल. दुपारी १२ वाजता चांदा क्लब ग्राऊंड येथे जाहीरसभा होईल. या सभेला बहुसंख्य लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अॅड.वामनराव चटप, आपचे मयूर राईकवार, अॅड.राजेश विराणी यांनी केले आहे.