कानठळ्या बसविणाऱ्या ‘डीजे’ने तरुणाईवर घातलेली मोहिनी ही चिंतेची बाब झाली असून याविरुद्ध कडक कारवाई करण्याची वेळ आली आहे. रविवारी नागपुरात घडलेल्या प्रकाराच्या पाश्र्वभूमीवर यापुढे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आदेश दिले जाणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
नागपुरातील सिव्हिल लाईन्स भागात बिशप कॉटन शाळेच्या मैदानावर तरुण-तरुणींसाठी ‘रेनडान्स’ आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी ‘डीजे’ची परवानगी मागण्यात आली होती. त्यासाठी आवश्यक अटी घालून पोलिसांनी परवानगी दिली. दुपारनंतर हा कार्यक्रम सुरू झाला. कृत्रिम पावसात तरुण-तरुणींचे नृत्य रंगात आले. त्याबरोबर ‘डीजे’चा आवाजही वाढू लागला. कुणीतरी पोलिसांना कळविल्यानंतर सदर पोलीस तेथे गेले. पोलीस आल्याचे दिसल्यानंतर आवाज अगदीच कमी करण्यात आला. आयोजकांना दम देऊन पोलीस तेथून निघून गेले. त्यानंतर काही वेळानंतर पुन्हा ‘डीजे’चा आवाज वाढला. सायंकाळी सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना आकाशवाणी चौकातून जात असताना तेथेपर्यंत आवाज ऐकू आल्याने त्यांनी तातडीने सदर पोलिसांशी संपर्क साधला. एवढय़ा मोठय़ा आवाजात ‘डीजे’ कसा, असा जाब विचारत कारवाईचे आदेश दिले. सदर पोलीस कार्यक्रमस्थळी गेले. त्यांनी कार्यक्रम थांबवला. ‘डीजे’चा परवानगी घेतली असल्याचे आयोजकांचे म्हणणे होते. परवानगी दिली असली तरी अटींकडे दुर्लक्ष केल्याचे आयोजकांना पोलिसांनी सुनावले. ‘डीजे’ पोलिसांनी जप्त करून त्याच्या मालकावर कारवाई केली.
कानठळ्या बसवणाऱ्या ‘डीजे’च्या आवाजाने कान बहिरे होण्याची जास्त शक्यता असल्याचे कान-नाक व घसा तज्ज्ञ डॉ. आशिष दिसवाल यांनी सांगितले. अचानक आवाज वाढल्याने चक्कर येऊ शकते. विशिष्ट मर्यादेबाहेर आवाज मग तो डीजे असो, वाहनांचे हॉर्न असो वा इतर कशाचा, कानाचे पडदे फाटतात. ऐकण्याच्या नैसर्गिक क्षमतेला धक्का पोहोचून तात्पुरते अथवा कायमचे बहिरेपणे येऊ शकते. वाहन चालवित असताना अचानक हॉर्न अथवा डीजेमुळे आवाज कानावर आदळला तर दचकून अपघाताची शक्यता असते. हृदयविकाराचा तीव्र झटकाही येऊ शकतो. लहान मुलगा असेल तर कायमचे बहिरेपण लगेचच येण्याची दाट शक्यता असले, असे डॉ. दिसवाल म्हणाले.
मुंबई-पुणे असो वा नागपूरचे तरुण- तरुणी, ‘डीजे’चा आवाज आरोग्यास अपायकारक असल्याची जाणीव असली तरीही ते त्यासाठी अक्षरश: वेडावले आहेत. नागपुरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची तीन-चार दिवसांपूर्वी पोलिसांनी बैठक घेऊन सूचना विचारल्या. ‘डीजे’वरील बंधने काढून टाकावी, अशी त्यांची एकमुखी मागणी होती. ‘डीजे’ने तरुणांवर किती मोहिनी घातली आहे, हेच यावरून स्पष्ट होते. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाचे गंभीर परिणाम लक्षात घेऊन र्निबध घातले आहेत. आता या र्निबधांची कडक अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
नागपुरात तीन-चार बडय़ा हॉटेल्समध्ये चालणाऱ्या पाटर्य़ावर पोलिसांनी कारवाई केली त्यात ‘डीजे’चा वापर झाल्याचे स्पष्ट झाले. स्वातंत्र्यदिनी डीजेचा वापर होत असल्याचे दिसताच पोलिसांनी कारवाई केली. रविवारी सिव्हिल लाईन्समध्ये आयोजित कार्यक्रमास दिलेल्या परवानगीचा गैरवापर झाला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. ‘डीजे’ अथवा ध्वनिक्षेपकाची परवानगी देण्याचे अधिकार पोलीस उपायुक्तांना आहेत. मात्र, अशी परवानगी देताना गांभीर्याने लक्ष देण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश देणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. अंकुश धनविजय यांनी सांगितले. परवानगी दिली तरी कार्यक्रमावर पोलिसांचे लक्ष असेल, असे पोलीस आयुक्त म्हणाले.
तरुणाईवर ‘डीजे’ची घातक मोहिनी.!
कानठळ्या बसविणाऱ्या 'डीजे'ने तरुणाईवर घातलेली मोहिनी ही चिंतेची बाब झाली असून याविरुद्ध कडक कारवाई करण्याची वेळ आली आहे. रविवारी नागपुरात घडलेल्या प्रकाराच्या पाश्र्वभूमीवर यापुढे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आदेश दिले जाणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी 'लोकसत्ता'ला सांगितले.
आणखी वाचा
First published on: 11-09-2012 at 10:34 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: %e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%b5%e0%a4%b0 %e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%95 %e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b9