महापालिकेचे वादग्रस्त उपायुक्त रवींद्र देवतळे यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव सर्वानुमते फेटाळून लावल्यानंतरही महापौर संगीता अमृतकर व आयुक्त प्रकाश बोखड यांनी त्यांना मुदतवाढ देऊन सर्वाधिकार बहाल केल्याने नगरसेवकांच्या वर्तुळात प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. नियमबाह्य़ पध्दतीने मुदतवाढ दिल्याने नगरसेवक शासनाकडे दाद मागणार आहे.
या ना त्या कारणाने वादग्रस्त ठरलेले येथील उपायुक्त रवींद्र देवतळे यांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर महापौर संगीता अमृतकर यांच्या निर्देशान्वये आयुक्त प्रकाश बोखड यांनी त्यांना दहा दिवसाची नियमबाह्य़ मुदतवाढ दिली होती, मात्र बहुतांश नगरसेवकांना देवतळे नको असल्याने या नियमबाह्य़ मुदतवाढीवरून सर्व नगरसेवक संतापले होते. दरम्यान, १९ जानेवारी रोजी झालेल्या पालिकेच्या आमसभेत उपमहापौर संदीप आवारी, सभापती नंदू नागरकर, नगरसेवक बलराम डोडानी, अंजली घोटेकर, संजय वैद्य, सुनिता लोढीया यांनी देवतळे यांच्या विरोधात भूमिका घेऊन मुदतवाढीसाठी आलेला प्रस्ताव फेटाळून लावला. एकदा आमसभेत मुदतवाढीचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर आयुक्तांनी शासनाला तसे कळवायला हवे होते. आमसभेच्या रेकॉर्ड बुकवर तशी नोंद घ्यायला हवी होती, मात्र येथे महापौर संगीता अमृतकर यांनी देवतळे यांना उपायुक्त म्हणून येथे ठेवण्यास महापालिका तयार असून राज्य शासनाने यासंदर्भात काय तो निर्णय घ्यावा, असे शासनाला कळविले आहे. नेमका हाच धागा पकडून आयुक्त प्रकाश बोखड यांनी परस्पर कारभार करून देवतळे यांच्याकडे उपायुक्तपदाचा कार्यभार सोपवला आहे. केवळ कार्यभारच सोपविला नाही तर आर्थिक व्यवहार वगळता सर्व महत्वाच्या कामांची जबाबदारीही देवतळे यांच्यावर सोपवली आहे.
आयुक्तांनी अधिकार देताच देवतळे यांनी आजपासून निविदा प्रक्रियेच्या कामाला सुरुवात केली. दरम्यान, आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत आमसभेचा वृत्तांत येताच त्यात महापौरांनीच उपायुक्तांची सेवा कायम करण्यात महापालिकेला कुठलीही अडचण असल्याचे निदर्शनास आले. हे बघताच स्थायी समिती सदस्य व नगरसेवकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. देवतळे अनेक कारणांनी वादग्रस्त ठरले आहेत. अशा उपायुक्तांना शासनाकडे परत पाठविण्याऐवजी आयुक्त व महापौर त्यांनाच येथे ठेवा, असा आग्रह धरत आहेत. त्यामुळेही अनेक नगरसेवक संतापले आहेत. विशेष म्हणजे, शिवसेनेचे उपामहापौर संदीप आवारी यांनी देवतळे यांची हकालपट्टी करण्याचा मुद्दा अतिशय पोटतिडकीने लावून धरला होता. आता आयुक्तांनीच त्यांची शिफारस केल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान, या नियमबाह्य़ मुदतवाढीच्या विरोधात आता नगरसेवकच शासनाकडे दाद मागणार आहेत. आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत देवतळे गैरहजर होते, तसेच पालिकेचा एकही अधिकारी या बैठकीला उपस्थित नव्हता.
वादग्रस्त उपायुक्त रवींद्र देवतळेंना नियमबाह्य़ मुदतवाढ
महापालिकेचे वादग्रस्त उपायुक्त रवींद्र देवतळे यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव सर्वानुमते फेटाळून लावल्यानंतरही महापौर संगीता अमृतकर व आयुक्त प्रकाश बोखड यांनी त्यांना मुदतवाढ देऊन सर्वाधिकार बहाल केल्याने नगरसेवकांच्या वर्तुळात प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे.
आणखी वाचा
First published on: 02-02-2013 at 04:34 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: %e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4 %e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4 %e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%a6