बॉलीवूडमध्ये छोटय़ा छोटय़ा कथानकांद्वारे वेगळीच मजा प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न केला जातोय. रहस्यमय चित्रपट म्हटला की अपेक्षित असलेले खिळवून ठेवणारे मनोरंजन करतानाच एका चमत्कारिक वळणावर चित्रपट संपावा तसे ‘घनचक्कर’ या चित्रपटात झाले आहे. ‘नो वन किल्ड जेसिका’ या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांनी स्मृतिभ्रंश झाल्यामुळे एका व्यक्तीच्या आयुष्याचा अंत कसा होऊ शकतो हे दाखविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. परंतु, रहस्याची उकल चित्रपटाच्या शेवटाला होते तेव्हा प्रेक्षकाला धक्का बसतो. शेवट खूप लांबल्यामुळे प्रेक्षकाला कंटाळाही येतो. चमत्कारिक पद्धतीच्या शेवटामुळे चित्रपटातील कथानकाचे वर्तुळ पूर्ण झाल्याचा आनंद प्रेक्षकाला मिळत नाही. संजू अत्रे (इम्रान हाश्मी) आणि नीतू (विद्या बालन) या जोडप्याने चोरीमारी करून पैसे कमावले आहेत. एखादं घबाड हाती लागलं की मजेत दिवस घालवायचे, अख्खा दिवस टीव्हीसमोर बसून काढायचा संजूला नाद आहे तर नीतूला फॅशनेबल राहण्याची दांडगी हौस आहे. इंग्रजी नियतकालिकांमधील फॅशन ट्रेण्ड्स बघून ती रोज पेहराव करते. दोघेही रिकामटेकडे असल्यामुळे घरबसल्या अनेक स्वप्नं बघत बसतात. संजूला मोठा डल्ला मारण्याची सुपारी मिळते. पंडित (राजेश शर्मा) आणि इद्रिस (नमित दास) या दोघांच्या सांगण्यावरून संजू बँक लुटतो आणि फक्त संजूकडेच फ्लॅट असल्याने कोटय़वधी रूपये तो घरी घेऊन जातो. तीन महिन्यांनी भेटायचे ठरते. परंतु, तीन महिन्यानंतर सारे काही बदललेले असते. अपघातामुळे संजूला स्मृतिभ्रंश होतो. कोटय़वधी रुपये परत मिळावेत म्हणून पंडित आणि इंद्रिस संजूच्या मागे लागतात. मग संशय, पैसे गेले कुठे याचे रहस्य उलगडावे म्हणून संजू-नीतू आणि पंडित-इद्रिस यांच्याबरोबरच प्रेक्षकालाही उत्कंठा लागून राहते.
दिग्दर्शकाने फक्त चारच मुख्य व्यक्तिरेखांभोवती सिनेमाची मांडणी अफलातून केली आहे. सिनेमा पाहताना ‘स्पेशल छब्बीस’च्या कथानकाची आठवण झाल्यावाचून राहत नाही. बॉलीवूडपटांच्या सरधोपट मांडणी आणि प्रेक्षकांना चांगलेच ठाऊक झालेल्या कथानकापेक्षा संपूर्णपणे वेगळी पद्धत दिग्दर्शकाने यात अवलंबली आहे. त्यामुळे विद्या बालन-इम्रान हाश्मी ही जोडी पडद्यावर दिसणार म्हटल्यावर अपेक्षित असलेली चुंबनदृश्ये किंवा साचेबद्ध रोमान्स याला दिग्दर्शकाने पूर्णपणे फाटा दिला आहे. संजूला स्मृतिभ्रंश झालाय हे प्रेक्षकाच्या मनावर ठसविण्यासाठी अनेक गमती-जमती दिग्दर्शकाने केल्या आहेत आणि त्या उत्तम जमल्या आहेत. त्यामुळे कोटय़वधी रुपयांचा डल्ला मारल्यानंतर एखाद्या माणसाला ते पैसे कुठे ठेवलेत हे आठवत नसेल तर काय अनवस्था प्रसंग ओढवेल हे प्रेक्षकाच्या मनावर चांगलेच ठसते. शिताफीने बँक लुटल्यानंतर तीन महिने काही हालचाल करायची नाही, किंवा कुठलीही खरेदी करायची नाही असे पंडित-इद्रिस आणि संजू ठरवितात. तीन महिन्यानंतर इतके काही बदलेल आणि आपले पैसे मिळणारच नाहीत याची सूतराम कल्पना पंडित-इद्रिसला नसते तशीच ती प्रेक्षकालाही नसते. अनपेक्षित पद्धतीने चित्रपट उलगडत जातो.
अस्सल पंजाबी तरूणी विद्या बालनने मस्त साकारली आहे. पंजाबी पद्धतीची संवादफेक, लकबी, यातून तिने नीतू झकास उभी केली आहे. इम्रान हाश्मी पडद्यावर नेहमी सडाफटिंगच दिसत असल्यामुळे बनवाबनवी करून पैसे कमावणे आणि डल्ला मारून झाला की अख्खा दिवस टीव्हीसमोर बसणे हे त्याला चांगले जमले आहे. दिग्दर्शकीय शैलीला दाद द्यायला हवी. बॉलीवूडच्या प्रेक्षकांना अनपेक्षित असलेली मांडणी, चित्रपटगृहात जाण्यापूर्वी प्रेक्षकाने सिनेमाविषयी बनविलेल्या मताला दिग्दर्शकाने चांगलाच धक्का दिला आहे.
बेधडकपणे वागणारी-बोलणारी आणि नवऱ्याला चोरी करण्यासाठी उत्तेजन देणारी नीतू ही व्यक्तिरेखाही बॉलीवूडपटांमध्ये नक्कीच वेगळी ठरावी. लेखन-दिग्दर्शन-अभिनय या तीन गोष्टींसाठी चित्रपटाची वाहवा करायला हवी. संजूला स्मृतिभ्रंश झाला असला तरी मधूनमधून त्याला काही गोष्टी आठवतात एवढय़ा एका आशेवर पंडित-इद्रिस त्याचा पिच्छा पुरवितात, म्हणूनच संजूला ते ठार करीत नाहीत. सर्वसाधारण नवरा-बायकोप्रमाणे नीतूला स्वयंपाक करण्याची भारी हौस असते परंतु तिला जमत काहीच नाही. संजूला जेवायला वाढल्यानंतर अमूक पदार्थ कसा झालाय वगैरे ती विचारते आणि त्यावर संजूने खुसपट काढले की त्याचे ताट काढून घेते. अशा छोटय़ा छोटय़ा प्रसंगातून नीतूची व्यक्तिरेखा बेधडक दाखवून दिग्दर्शकाने विनोदाची पेरणी केली आहे. संजू-नीतू जेवत असताना रोज रात्री संजूच्या आईचा फोन येतो, आणि तू जेवलास का असे त्याला आई विचारते. आई-संजूचे नेहमीच संभाषण ऐकून नीतूप्रमाणेच प्रेक्षकही संजूची खिल्ली उडवतील अशा पद्धतीची मांडणी दिग्दर्शकाने केली आहे. अभिनय, नावीन्यपूर्ण मांडणी यासाठी चित्रपट पाहायला हरकत नाही.
घनचक्कर
निर्माते – रॉनी स्क्रूवाला, सिद्धार्थ रॉय कपूर
दिग्दर्शक – राजकुमार गुप्ता
पटकथा – परवेझ शेख, राजकुमार गुप्ता
संगीत – अमित त्रिवेदी
संकलन – आरती बजाज
कलावंत – विद्या बालन, इम्रान हाश्मी, नमित दास, राजेश शर्मा