भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थेच्या शहरातील शाखेत सव्वा कोटी रुपयांचा अपहार झाला असून, शाखा व्यवस्थापकासह सहाजणांविरुद्ध पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रायसोनी पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुखलाल सहादू माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाखा व्यवस्थापक जीवन स्वरूपचंद बरडिया, लिपिक रवींद्र श्यामराव पाटील, संजय भाऊसाहेब मोरे, भारत अशोकलाल कर्नावट, अनिता मुकुंद मोहेकर, मुनीर अब्बास पठाण यांच्या विरुद्ध अपहार बनावट दस्तऐवज तयार करणे आदी कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जळगाव येथील रायसोनी पतसंस्थेची शहरात मुख्य रस्त्यावर लोकमान्य टिळक वाचनालयासमोर शाखा आहे. संचालक मंडळाने या शाखेच्या अधिकारी व कर्मचा-यांना सह्यांचे अधिकार दिले होते. पतसंस्थेच्या नगर जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत तसेच अर्बन बँकेत ठेवी आहेत. या ठेवींवर शाखा व्यवस्थापक बरडिया व कर्मचा-यांनी संगनमत करून कर्ज काढले. पण हे कर्ज पतसंस्थेच्या खात्यात भरले नाही. मुनीर पठाण व अन्य एकाने तर दोन्ही खात्यावरील पैसे काढले. यात बँकेची फसवणूक झाली असे मुख्य व्यवस्थापक माळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे करीत आहेत.