छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या विकासासाठी तसेच बॅडमिंटन, व्हॉलिबॉल, टेनिस कोर्ट, लांब उडी आदी मैदाने तयार करण्यासाठी कराड पालिकेला सव्वाकोटी रुपयांचा  निधी देण्याची ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. सातारा येथेही बॅडमिंटन कोर्टसाठी ७५ लाखांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
माजी केंद्रीय मंत्री आनंदराव चव्हाण व माजी खासदार श्रीमती प्रेमलाकाकी चव्हाण यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमती प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट व सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनतर्फे आयोजित पहिल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पध्रेचे पारितोषिक वितरण मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते समारंभपूर्वक पार पडले. त्या प्रसंगी ते बोलत होते. गृह राज्यमंत्री सतेज पाटील, भाई पंजाबराव चव्हाण, राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप गंधे, उपाध्यक्ष शिवाजीराजे भोसले, स्पध्रेचे प्रमुख संयोजक अध्यक्ष राहुल चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, अतुल भोसले यांची उपस्थिती होती. दरम्यान, स्पध्रेतील अंतिम सामना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित सुरू झाला. या वेळी मुख्यमंत्री चव्हाण यांनीही काही वेळा बॅडमिंटन खेळण्याचा आनंद घेतला. उपस्थितांनी त्यास टाळय़ांनी दाद दिली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की नेटक्या नियोजनात अतिशय उत्तम रीत्या पार पडलेल्या या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पध्रेसाठी कराड पालिकेचे मोठे सहकार्य मिळाले आहे. कराड पालिकेला राज्यशासनातर्फे देण्यात येणाऱ्या सव्वाकोटी रुपयांतून छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या विकास व सुधारणा करण्यात येतील. त्यामध्ये बास्केटबॉल मैदानासाठी ५ लाख, व्हॉलिबॉल मैदानासाठी २ लाख, दोन टेनिस कोर्ट तयार करण्यासाठी ३५ लाख, लांब उडीच्या मैदानासाठी १ लाख शिवाजी स्टेडियमच्या संकुलातील नवीन जिम्नॅशियम हॉलमध्ये व्यायाम साहित्य खरेदीसाठी १३ लाख स्टेडियमच्या संरक्षक भिंतीची सुधारणा व प्रवेशद्वार बसवण्यासाठी ३० लाख, व्यायामासाठी सिंगल बार, डबल बार बसवणे, मैदान विकसित करण्यासाठी दोन लाख, तसेच स्टेडियममधील अस्तित्वातील बॅडमिंटन हॉलच्या नूतनीकरणासाठी ३२ लाखांचा निधी देण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा