किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याकडून १ कोटी २८ हजार ८३४ लिटर अल्कोहोलचे (रेक्टिफाईड स्पिरिटचे) उत्पादन झाले आहे. हा कारखान्याच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीतील एक विक्रम आहे.
या निमित्त डिस्टिलरीच्या मशिनचे पूजन करण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी कारखान्यात पूरक उद्योगांना चालना दिली आहे. दैनंदिन ३० हजार लिटरची डिस्टिलरी व तितक्याच क्षमतेच्या जुन्या डिस्टिलरीचे आधुनिकीकरण करून डिस्टिलरीची उत्पादन क्षमता दररोज एक लाख लिटर करण्यात आली आहे. डिस्टिलरी प्रकल्प बारमाही सुरू रहावा यासाठी स्वतंत्र दहा टनी बॉयलर आणि १.२ मेगाव्ॉट क्षमतेचे टर्बाइन बसविण्यात आले आहे.
या विक्रमी उत्पादनाबद्दल कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी डिस्टिलरीचे व्यवस्थापक एस.वाय. महिंद यांचा सत्कार केला. या वेळी संचालक अशोक मोरे, रोहिदास पिसाळ, किसन कदम, रतन शिंदे, कार्यकारी संचालक विजय वाबळे आदी उपस्थित होते.