जातिनिहाय जनगणनेच्या सर्वेक्षणाचे जिल्ह्य़ातील २ हजार ७३७ माध्यमिक शिक्षकांचे गेल्या वर्षभरापासून १ कोटी २० लाख रुपयांचे मानधन थकवले गेले आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पाठपुरावा करून हे पैसे मिळत नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे.
या नाराजीकडे लक्ष वेधत जिल्हा माध्यमिक शिक्षक भारती संघटनेने, प्रकल्प संचालक डॉ. वसंतराव गारुडकर यांच्याकडे हे मानधन तात्काळ मिळण्याची मागणी केली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोंढे, सचिव मोहमदसमी शेख, कार्याध्यक्ष सुनील गाडगे, अजय बारगळ, बापूसाहेब गायकवाड, अप्पासाहेब जगताप, हनुमंत रायकर, सुधीर शेडगे, संदीप घोगरे, श्रीकांत गाडगे, जॉन सोनवणे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. जिल्ह्य़ात नोव्हेंबर २०११ ते मे २०१२ असे ७ महिने सर्वेक्षणाचे काम सुरू होते. त्यासाठी प्रत्येक शिक्षकाला ४५ दिवसांचा कालावधी दिला गेला होता. अकोले, श्रीरामपूर, राहाता, राहुरी या तालुक्यांतील शिक्षकांना त्यांचे संपूर्ण मानधन पूर्वीच मिळाले, मात्र इतर शिक्षक अद्यापि मानधनापासून वंचित आहेत.
अनुदान उपलब्ध नसल्याचे कारण देत १ कोटी २० लाख रुपयांपासून २ हजार ७३७ शिक्षकांना वंचित ठेवले गेले आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे ७४ लाख रुपये उपलब्ध आहेत, अद्याप ग्रामीण विकास मंत्रालयाकडून ४६ लाख रु. येणे बाकी आहे, त्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. मंत्रालयाने उपयोगिता प्रमाणपत्र मागितले होते, त्याची पूर्तता करण्यात आली आहे. जुलैअखेर अनुदान प्राप्त होताच ते शिक्षकांच्या खात्यात जमा केले जाईल, असे आश्वासन गारुडकर यांनी शिष्टमंडळास दिले.

Story img Loader