प्रत्येक तालुक्यास क्रीडा संकुलासाठी दीड कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहाला विंधनविहिरी व पुढील वर्षीच्या विभागीय स्पर्धेसाठी नगरपालिकेच्या वतीने सहकार्य करणार असल्याची ग्वाही डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली.
येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या क्रीडांगणावर व्यवसाय व प्रशिक्षण संस्थेंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन डॉ. क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. बाजार समितीचे सभापती अरुण डाके, जिल्हा परिषद सदस्य किशोर जगताप आदी उपस्थित होते. डॉ. क्षीरसागर म्हणाले, की क्रीडासंघात जात, धर्म उच्च-नीच असा भेदभाव नसतो. सांघिकपणे सर्व खेळाडू आपल्या संघाच्या विजयासाठी खेळत असतात. खेळामुळे कठीण स्थितीतही मानसिक संतुलन सांभाळण्याची क्षमता निर्माण होत असते. चांगल्या शरीर अवस्थांबरोबरच खेळामुळे राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होते. क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा व आपल्यातील क्रीडाकौशल्यांना चालना द्यावी. बीड शहरात एकदिवसीय क्रिकेट व रणजी सामने व्हावेत या धर्तीवर क्रीडा संकुलाची उभारणी जागा उपलब्ध झाल्यास करण्यात येणार असून, याबाबत वरिष्ठांशी बोलणे झाल्याचे त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 5crore fund to every distrect for sports complex