नगर शहरातील जिल्हा क्रीडा संकुल (वाडिया पार्क) तसेच सहा तालुका क्रीडा संकुलात विविध खेळांच्या आणखी सुविधा निर्माण करण्यासाठी सुमारे ३ कोटी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी येथे प्राप्तही झाला. तालुका क्रीडा संकुले वापरात रहावीत यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालय तेथे क्रीडा मार्गदर्शकही नियुक्त करणार आहे.
जिल्हा क्रीडाधिकारी अनिल चोरमले यांनी ‘लोकसत्ता’ला ही माहिती दिली. जिल्हा क्रीडा संकुलातील सुविधांसाठी १ कोटी रुपये व श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, शेवगाव, नगर व कोपरगाव येथील तालुका क्रीडा संकुलासाठी २ कोटी ३० लाख रुपये असा एकुण ३ कोटी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक नियोजनाला सरकारने वीस टक्के कपात लागू केली आहे. कपातीचा पहिला फटका दरवेळेस क्रीडा विभागास बसत असल्याचा खेळाडू व क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा अनुभव आहे. मात्र यंदा जिल्ह्य़ातील क्रीडा विकासासाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. नगरचे जिल्हा क्रीडाधिकारपद गेली सुमारे तीन वर्षे रिक्त होते. तीन महिन्यांपुर्वी चोरमले यांची या पदावर नियुक्ती झाली.
जिल्हा क्रीडा संकुलासाठी गेल्या वर्षी दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. जिल्ह्य़ात नगर तालुक्यासह (बुऱ्हाणनगर) पारनेर, शेवगाव, संगमनेर, कोपरगाव, जामखेड, कर्जत व श्रीगोंदे येथे तालुका क्रीडा संकुले उभारण्यात आलेली आहेत. तालुका क्रीडा संकुलांसाठी सरकारने सुरवातीला २५ लाख रुपये खर्चाचे बंधन घातले होते. या संकुलात सध्या बॅडमिंटन हॉल, २०० मिटरचा धावनमार्ग, खो-खो, कबड्डीसह काही ठिकाणी व्हॉलिबॉल व काही ठिकाणी बास्केटबॉलची मैदाने तयार करण्यात आली आहेत. राहाता, राहुरी व पाथर्डी या तीन ठिकाणी जागा उपलब्ध होत नसल्याने तेथे योजना लागू करता आली नाही. अकोल्यात अलिकडेच जागा उपलब्ध करण्यात आली. तेथील संकुलाचा प्रस्ताव तयार केला जात आहे.
दोन वर्षांपुर्वी राज्य सरकारने तालुका क्रीडा संकुलासाठी प्रत्येकी १ कोटी रुपये उपलब्ध करण्याचे जाहीर केले. त्यामुळे ज्या ठिकाणी २५ लाख रुपये खर्च मर्यादेची संकुले उभारली तेथे उर्वरित ७५ लाख रुपयांतून संकुलातील सुविधांचा दर्जा सुधरवणे, आणखी सुविधा उपलब्ध केल्या जाणार होत्या. त्यानुसार जिल्हा क्रीडा कार्यालयाने तालुका संकुले ‘अपग्रेड’ करण्याचे प्रस्ताव क्रीडा व युवक संचलनालयाच्या आयुक्तांकडे पाठवले होते. या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्याचे चोरमले यांनी सांगितले. त्यामध्ये नगरसाठी (बुऱ्हाणनगर) ३५ लाख रुपये, कर्जत व जामखेडसाठी प्रत्येकी ४० लाख रुपये, श्रीगोंदेसाठी ३५ लाख रुपये व कोपरगावसाठी १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून बॅडमिंटन हॉलमध्ये ‘वुडन फ्लोअरिंग’, कंपाऊंड, इतर खेळांची मैदाने निर्माण केली जाणार आहेत. अकोल्याचा प्रस्ताव १ कोटी रुपयांनुसार केला जात आहे.
जागा उपलब्ध न झाल्याने तालुका क्रीडा संकुले काही ठिकाणी शहराबाहेर उभारावी लागली आहेत. ठराविक काळात होणाऱ्या शालेय स्पर्धाव्यतिरिक्त बहुतेक संकुले वापराविना आहेत. संकुलातील सुविधांचा वापर वाढावा यासाठी मैदाने शाळांना उपलब्ध करुन दिली जाणार आहेत, क्रीडा मंडळांना सरावासाठी दिली जाणार आहेत, तालुका संकुल समितीमार्फत तेथे मानधन तत्वावर दोन-दोन क्रीडा मार्गदर्शकाची नियुक्ती केली जाणार असल्याचे चोरमले यांनी सांगितले. संकुलांसाठी उपलब्ध झालेला निधी तालुका समितीकडे वर्ग केला जाणार आहे. ही समिती तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे.
नगरला लॉन टेनिस कोर्ट
वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलासाठीही १ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. त्यातून संकुलात लॉन टेनिससाठी सिंथेटिक कोर्ट, वाढता प्रतिसाद असल्याने बास्केटबॉलसाठी आणखी एक सिमेंट कोर्ट, महिला खेळाडूंसाठी चेंजिंग रुम्स, स्वच्छतागृह, जलतरण तलावाचे उर्वरित काम अशी कामे केली जाणार असल्याचे जिल्हा क्रीडाधिकारी चोरमले यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा