पाटण तालुक्यातील चाफळनजीकच्या कोचरेवाडी घाटरस्त्यावरील वळणावर मोटार (क्रमांक एमएच ४३ ए ५८३) चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात रंगूबाई हरिबा मोहिते ही ६५ वर्षीय वृध्द महिला ठार झाली. तर, चालकासह अकराजण जखमी झाले आहेत. घटनेचे वृत्त समजताच कोचरेवाडी व दाडोली ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे एकच धाव घेऊन जखमींना गाडीतून बाहेर काढण्याची शिकस्त केली. या अपघाताची नोंद उंब्रज पोलिसात झाली असली तरी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघाताची प्राथमिक माहितीही सायंकाळी उशिरापर्यंत उपलब्ध नसल्याचे फौजदार चौधरी यांनी सांगितले.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोचरेवाडी येथून कराड तालुक्यातील कोरिवळे येथे शेतमजुरी करणाऱ्या महिलांना घेऊन ही मोटार निघाली होती. चालक चंद्रकांत तुकाराम मोहिते (वय ४०) याचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्ता सोडून खोल दरीच्या बाजूस उलटली. त्यात मोटारीमधील सुमन आत्माराम सूर्यवंशी (वय ४०), कविता मारूती मोहिते (वय ३५) मारूती रामचंद्र मोहिते (वय ४२), लक्ष्मी थोरात (वय ३६) तसेच व्हॅनचालक चंद्रकांत तुकाराम मोहिते असे पाचजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याचबरोबर नंदा बाळासो मोहिते, मंगल मधुकर मोहिते, शकुंतला मारूती मोहिते, नंदा काशिनाथ सूर्यवंशी, नर्मदा हणमंत मोहिते, उषा शहाजी मोहिते असे सहाजण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चाफळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. महेश पाटील यांनी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

 

Story img Loader