पाळीव कुत्र्यांना शिकारीचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या १८ शिकाऱ्यांना साकोली न्यायालयाने एक वर्षांची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे.  शिकारीची ही घटना २००४ मध्ये नागझिरा अभयारण्यात आताचे नागझिरा व्याघ्र प्रकल्पात घडली होती. तब्बल ११ वर्षांनंतर या खटल्यातील दोषींना शिक्षा सुनावण्यात आली.
गेल्या २ जुल २००४ मध्ये नागझिरा अभयारण्यातील वन कर्मचारी नेहमीप्रमाणे गस्तीवर होते. पहाटे ५ वाजताच्या सुमारास वन कर्मचाऱ्यांना गावठी कुत्रे व सांबरांच्या किंचाळण्याचा आजावा ऐकू आला. कर्मचाऱ्यांनी आणखी काही कर्मचाऱ्यांना गोळा करून आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी नागझिरा अभयारण्यातील कक्ष क्रमांक १२५ मध्ये दोन वयस्कर सांबार मृत आढळून आले. त्याच कक्षात त्यांना काही गावठी कुत्रे दिसून आले. कर्मचाऱ्यांनी कुत्र्यांचा पाठलाग केला असता कक्ष क्रमांक १२१ मध्ये पुन्हा मृत सांबर आढळून आले. वनकर्मचारी आणखी काही पुढे केले असता कक्ष क्रमांक १२७ मध्ये काही कुत्र्यांसोबत शिकारीसुद्धा आढळून आले. त्यावेळी १८ शिकाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून एकूण आठ वन्यप्राण्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले, तसेच आठ गावठी कुत्र्यांनासुद्धा ताब्यात घेतले.
शिकाऱ्यांमध्ये भयालाल राजाराम कळपते (३५,रा. खांबा), मूलचंद नारायण सलामे (२४, रा.सातलवाडा) ,पांडुरंग काशिराम राऊत (२८,रा.सातलवाडा), चतराम जयचंद सयाम (४०,रा.रेंगेपार), गजानन लक्ष्मण सखरी (४०,रा.सातलवाडा) ,राधेश्याम भयालाल पाचे (२७, रा.रेंगेपार), अभिमन सदाशिव राऊत (२५,रा.सातलवाडा), विश्वनाथ दौलत मेश्राम (३३, रा.रेंगेपार), सुरेश श्रीराम राऊत (३०,रा.सातलवाडा), पतीराम जगू भोंडे (३०,रा.सातलवाडा), खुशाल आत्माराम सोनवाने (२७रा. पळसगाव-डव्वा ता.स.अर्जुनी), मनोहर शंकर सोनवाने (३३,रा.पळसगाव), युवराज रूपचंद सावरकर (४२,रा.खांबा सेंदूरवाफा), कालिदास विठोबा चौधरी (२३,रा. खांबा) यांच्यासह इतरांचा समावेश आहे. या शिकाऱ्यांनी नागझिरा अभयारण्यातील सुमारे १३०० हेक्टर क्षेत्रफळात ही शिकार केली. या सवार्ंना साकोली न्यायालयाने दोषी ठरवून एक वर्षांची सक्तमजुरी व ५०० रुपयांचा दंड, दंड न भरल्यास पुन्हा एक महिन्याचा कारावास, अशी शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाच्या आदेशाचे आपण स्वागत करीत असून या आदेशामुळे भविष्यात वन्यप्राण्यांच्या शिकारीवर आळा बसेल. याशिवाय, जंगलात होत असलेल्या अवैध कामांवर वचक बसेल, असे नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक अशोक खुणे यांनी सांगितले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा