मिरजकर तिकटी येथील एसएस कम्युनिकेशन या मोबाईल विक्रीच्या दुकानातून १० लाख ५२ हजार रूपये किमतीचे मोबाईल हॅण्डसेट व अन्य साहित्य चोरटय़ांनी बुधवारी पहाटे लंपास केले. दुकानात असलेल्या सीसी टीव्हीमध्ये चोरटे चोरी करीत असतांना दिसत असून त्याआधारे शोध घेतला जात आहे. सुमारे ४०मिनिटात चोरटय़ांनी लूट केली असल्याचे दिसून आले आहे. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये जावेदअब्दुलरशिद मुश्रीफ यांनी फिर्याद दिली आहे.
जावेद मुश्रीफ रा.लाईन बझार कसबा बावडा यांचे मिरजकर तिकटी येथे एसएस कम्युनिकेशन नावाचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. मंगळवारी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले होते. बुधवारी सकाळी ते दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचे कुलूप उचकटल्याचे दिसून आले. त्यांनी जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. या दुकानामध्ये सीसी टीव्ही बसविण्यात आले आहेत. त्याची पाहणी पोलीस अधिकाऱ्यांनी केली. त्यामध्ये पहाटे ४ वाजून १७ मिनिटे ते ४ वाजून ५८ मिनिटे या कालावधीत दोघे चोरटे दुकानातील मोबाईल व अन्य साहित्य चोरून नेत असल्याचे दिसून आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे.    
चोरटय़ांनी मोबाईल हॅण्डसेट, बॅटरी चार्जर, हेडफोन, ब्लूटूथ, मेमरी कार्ड आदी सुमारे १० लाख ५२ हजार रूपये किमतीचे साहित्य दुकानातून लांबविले आहे.
 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 5 lakh of mobiles and other things stolen from mobile shopee