येथील नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत १० कोटी ९९ लाख रुपयांचा नफा मिळविला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी दिली.
सहकार क्षेत्रातील अस्थिर वातावरणामुळे २००६ मध्ये बँकेची स्थिती अतिशय प्रतिकूल होती. बँक त्यातून बाहेर येईल किंवा नाही अशी धास्ती असताना २००५-०६ ते २०११-१२ या कालावधीत बँकेस पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न केले. प्रथम वसुलीवर लक्ष केंद्रित करून कटुताही घेण्यात आली. बँकेच्या प्रगतीसाठी काळ सुसंगत बदल केले. त्याचाच परिपाक म्हणून वीज बील भरणा केंद्र, आरटीजीएस, सरकारी कर भरणा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या. लवकरच बँकेमार्फत कोअर बँकिंग व एटीएम सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. नियमित परतफेड करणाऱ्या कर्जदारांमुळे बँकेने ३१ मार्च २०१३ अखेर लक्षणीय कामगिरी केल्याचे अरिंगळे यांनी म्हटले आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत बँकेच्या ठेवी २८७ कोटी १४ लाख रुपयांवर पोहचल्या आहेत. १८१ कोटी चार लाख रुपयांचे कर्ज वाटप, ढोबळ एनपीए ६.६६ टक्के तर निव्वळ एनपीपी शून्य टक्क्यांवर आल्याची माहिती अरिंगळे यांनी दिली. २००६-०७ या आर्थिक वर्षांत बँकेने ६१ लाख रुपयांचा  निव्वळ नफा मिळविला होता.
त्याचा विचार करता प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत बँकेने चांगली कामगिरी केल्याचा दावा त्यांनी केला. बँकेच्या विविध कर्ज योजनांचा लाभ सभासद, खातेदार व ठेवीदारांनी घेतला आहे. जनसामान्यांची निवाऱ्याची गरज भागविण्यासाठी घरकर्ज, सोनेतारण कर्ज १२ टक्के व्याजदराने देत आहे. केंद्र शासनाच्या ९७ व्या घटना दुरुस्तीनंतर महाराष्ट्र शासनाने नागरी सहकारी बँकांसाठी तयार केलेल्या आदर्श उपविधी मध्ये संचालक मंडळाने केलेल्या सुसंगत बदलांसह आदर्श उपविधी स्वीकृत करण्यासाठी बँकेतर्फे १३ एप्रिल २०१३ रोजी सकाळी ११ वाजता इंगळेनगर येथील बँकेच्या सभागृहात विशेष वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेस बँकेचे सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असेही आवाहन यावेळी संचालक मंडळाने केले आहे.

Story img Loader