जिल्ह्य़ातील उमरेड आणि भिवापूर तालुक्यात डेंग्यूचे १० संशयित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाची धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान, संशयित डेंग्यूच्या रुग्णांना उपचारासाठी मेडिकलमध्ये हलवण्यात आले आहे.
डेंग्यू हा आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. पावसाळ्यात विशेषत ऑगस्ट, सप्टेंबर व नोव्हेंबर या तीन महिन्यात डासांची उत्पत्ती मोठय़ा प्रमाणात होते. या कालावधीत कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य असते. त्याचा परिणाम डास निर्माण होण्यात होतो. आरोग्य विभाग परिसराची स्वच्छता ठेवण्याच्या सूचना करत असतानाही ग्रामपंचायती त्याकडे दुर्लक्ष करते आणि मग डास चावल्याने हिवताप, मलेरिया, डेंग्यू, मेंदूज्वर हे आजार निर्माण होतात. भिवापूर येथे चार संशयित डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये राणी सुरेश पुरी (१०), मंथन ढवळे (१५), लक्ष्मण आत्राम (२२) आणि नम्रता किशोर पुरी (२ वर्षे) यांचा समावेश आहे. या सर्वावर सर्वप्रथम भिवापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पाठवण्यात आले. त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
उमरेड तालुक्यातील पाचगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ठोबरा गावातही सहा जणांना हिवताप आला आहे. त्यांच्या लक्षणावरून त्यांना डेग्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
स्वाती विवेक रंगारी (१४), शिवाजी मिलिंद मेश्राम (१४), तुजा रामू इंगळे (८), ऐश्वर्या केवलराम शामकुवर (१४), लोकेश प्रभुदास मेश्राम (१८) आणि श्रेया चंद्रप्रकाश मेश्राम अशी संशयित डेंग्यू रुग्णांची नावे आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. या सर्वाना उपचारासाठी मेडिकलमध्ये पाठवण्यात आले आहे. ही माहिती मिळताच आरोग्य खाते जागे झाले. या गावात प्राथमिक आरोग्य केंद्राचे एक पथक तैनात करण्यात आले असून गावातील प्रत्येकाच्या रक्ताचे नमुने घेतले जात आहे. तसेच अन्य सोयी सुविधा पुरवण्यात येत आहे.
दरम्यान, ही माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. बी.एच. पारधी यांनी भिवापूर आणि ठोबरा गावाला भेट देऊन आरोग्य अधिकाऱ्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या. भिवापूर आणि ठोबरा गावातील संशयित डेंग्यू रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. नमुन्याच्या अहवालानंतरच त्यांना नेमका कोणता आजार झाला, हे स्पष्ट होणार असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. बी.एच. पारधी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
या गावात धूर फवारणी, नाल्यांची सफाई, शेणखते गावाबाहेर नेणे आदी कामे सुरू करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्य़ात डेंग्यूचे १० संशयित रुग्ण
जिल्ह्य़ातील उमरेड आणि भिवापूर तालुक्यात डेंग्यूचे १० संशयित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाची धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान, संशयित डेंग्यूच्या रुग्णांना उपचारासाठी मेडिकलमध्ये हलवण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-09-2014 at 08:00 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 dengue suspected patients in nagpur