महिला सक्षमीकरणासाठी योजनांची लांबलचक यादी तयार करणाऱ्या व ‘जेंडर बजेट’ची दवंडी पिटणाऱ्या सरकारने आणि महानगरपालिकेने महिलांच्या मूलभूत प्रश्नाकडे मात्र डोळेझाक केली आहे. महिला धोरणातील आराखडय़ानुसार शहरात द्रुतगती मार्गाजवळ महिलांसाठी १० ठिकाणी स्वच्छतागृहे बांधण्याचे ठरल्यावर या सर्व ठिकाणी ती बांधली गेल्याचे मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीत सांगितले गेले. प्रत्यक्षात मात्र यापकी कोणत्याही ठिकाणी वीटही ठेवली गेलेली नाही.
महिलांच्या सोयीसाठी पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावर  १० ठिकाणे स्वच्छतागृहांसाठी निवडण्यात आली होती. या ठिकाणी स्वच्छतागृहे बांधली गेली आहेत, असे महिला व बाल कल्याण मंत्री, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व मुख्यमंत्री यांच्या २४ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीतील नोंदीत लिहिण्यात आले व त्याची प्रतही यासंदर्भात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिली गेली. प्रत्यक्षात कार्यकत्रे यातील चार ठिकाणी गेले असता तीन ठिकाणी एकही वीट उभी राहिली नसल्याचे तर चौथे ठिकाण द्रुतगती मार्गापासून १० मिनिटांवर असल्याचे लक्षात आले. ‘विक्रोळी येथील दोन जागा आणि घाटकोपर येथे अजिबात बांधकाम झाले नव्हते तर चेंबूर येथील राहुलनगर वस्तीतील जागा द्रुतगती मार्गापासून १० मिनिटांवर होती,’ अशी माहिती कार्यकर्त्यां सुप्रिया सोनार यांनी दिली.
 गेली काही वष्रे ‘राइट टू पी’ आंदोलनामार्फत महिलांसाठी मोफत मुतारी व मुतारींची संख्या वाढवणे या दोन प्रमुख विषयाबाबत काम सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी शहरात पुरुषांसाठी २८५९ मुताऱ्या तर महिलांसाठी एकही स्वच्छतागृह नाही, असे पालिकेकडूनच सांगण्यात आले होते. आता महिलांसाठी ११३ व पुरुषांसाठी ३७०५ मुताऱ्या असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र ही माहिती फसवी असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. गेल्या दोन वर्षांत पालिकेने यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलले नसताना मुताऱ्यांची संख्या कशी वाढली, असा त्यांचा प्रश्न आहे. मुतारी आणि शौचालये बांधण्यासाठी पालिका तयार आहे, मात्र त्यासाठी शहरात जागाच नाहीत, असा पवित्रा महानगरपालिकेने घेतला आहे. संस्थांनी पाच जागा दाखवल्यावर या जागांचे वाद, मालकी, इतर समस्या सांगून पालिकेने सर्व प्रस्ताव धुडकावून लावले, अशी माहिती कोरो संस्थेचे संचालक महेंद्र रोकडे यांनी दिली. अशा परिस्थितीत दहा जागा ठरवल्या गेल्यानंतर किमान तिथे तरी वेळेत शौचालये बांधणे आवश्यक होते. मात्र तेदेखील पालिकेने केले नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.
स्वच्छतागृहांसाठी निवडण्यात आलेली दहा ठिकाणे
* राहुल नगर, चेंबूर
* गारोडिया नगर, घाटकोपर
* गोदरेज गेटजवळ, विक्रोळी(प)
* फूट ओव्हर ब्रीजजवळ, भांडूप
* विक्रोळी गावाजवळ, विक्रोळी (पू.)
* आग्रीपाडा,
* विलेपाल्रे
* एस. व्ही. रोड अंधेरी (प.)
* इस्माइल युसुफ महाविद्यालयाजवळ, जोगेश्वरी
* िदडोशी उड्डाणपूल, गोरेगाव
‘द्रुतगती मार्गानजिकच्या दहा ठिकाणी शौचालये अजून बांधण्यात आलेली नाही. बांधकाम करण्यासंबंधी निविदा मागवण्यासाठीचा मसुदा तयार असून तो लवकरच संकेतस्थळावर टाकला जाईल,’ असे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक यमगर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा