पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेपाठोपाठ शहरातील तोफखाना पोलिसांनी जिल्हय़ात गावठी पिस्तुलांची विक्री करणारी मोठी टोळी उघडकीस आणली असली, तरी या दोन्ही टोळय़ांना शस्त्रपुरवठा करणारा जिल्हय़ातीलच सूत्रधार मात्र अजूनही फरारच आहे. या दोन्ही टोळय़ांचा सूत्रधार मध्य प्रदेशातून स्वस्तात शस्त्रे आणून नगरमध्ये चढय़ा किमतीत विकतो. दोन्ही टोळय़ांकडून १० पिस्तूल, ३० काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गेल्या आठवडय़ात ८ जणांना अटक करून त्यांच्याकडून ५ गावठी पिस्तूल, १० काडतुसे जप्त केली. या टोळीचा प्रमुख ज्ञानेश्वर कुसळकर (नेवासे) याच्या कोठडीत न्यायालयाने आज दोन दिवसांची वाढ केली. तर तोफखाना पोलिसांनी रविवारी रात्री ९ जणांना अटक करून त्यांच्याकडून देशी बनावटीचे ५ पिस्तूल, २० काडतुसे व १ एअरगन जप्त केली. या सर्वाना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज दिला. अटक केलेल्यांमध्ये खंडाळय़ाचा (ता. नगर) माजी सरपंच विकास अप्पासाहेब लोटके (वय ३३) याचाही समावेश आहे.
मोहन अण्णा वेठेकर (वय २३ पांढरेवाडी, कोळगाव, श्रीगोंदे) हा तोफखाना पोलिसांनी अटक केलेल्या टोळीचा प्रमुख आहे. अशोक बाबुराव कुसमोडे (३५, वांबोरी), कुलदीप रमेश पाटील (२२, वांबोरी), बापू बलभीम निभोरे (२९ घोटवी, श्रीगोंदे), महेश शांताराम गुंड (२१, वडगाव गुंड, देवीभोयरे, पारनेर), संतोष अशोक भाकरे (२४, वांबोरी) व राहुल अंकुश गुंड (२१, देवीभोयरे, पारनेर) यांना अटक करण्यात आली आहे.
वेठेकर व कुसाळकर दोघेही एकाकडून शस्त्रे खरेदी करत. हा सूत्रधार मध्य प्रदेशातून गावठी कट्टे आणतो व नगर जिल्हय़ात विकतो. या सूत्रधाराने या दोन टोळय़ांशिवाय इतरांनाही शस्त्रे विकली असल्याने शस्त्रे खरेदी-विक्रीची व्याप्ती मोठी आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयसिंह पवार व शाखेचे सहायक निरीक्षक किरणकुमार बकाले अधिक तपास करत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा