हुंडय़ासाठी नवविवाहितेस आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरुन न्यायालयाने पती व सासूला १० वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा आज दिली. वेगवेगळ्या कलमान्वये दोघांना प्रत्येकी एकूण २२ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.
जिल्हा सत्र न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी या खटल्याचा निकाल दिला. संतोष बबन शेलार (वय २७, रा. वडगाव गुप्ता, नगर) व सासूकौशल्या बबन शेलार या दोघांना शिक्षा देण्यात आली. सरकारतर्फे सरकारी वकिल सुरेश लगड यांनी काम पाहिले. खटल्यात एकुण ५ साक्षीदार तपासण्यात आले.
राणी उर्फ विद्या संतोष शेलार (वय२२) हिचा विवाह २४ फेब्रुवारी २०११ रोजी झाला. नंतर लगेचच सहा महिन्यांत तीने हुंडय़ाचे राहीलेले ३० हजार रु. माहेरहून आणावेत तसेच चारचाकी घेण्यासाठी वडिलांच्या नावावरील फिक्स डिपॉझिटमधील ८० हजार रु. आणावेत यासाठी तीचा सासरी छळ सुरु झाला. या छळाची कल्पना तीने माहेरी दिली होती. छळास कंटाळून तिने १५ सप्टेंबर २०१२ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा भाऊ प्रशांत अर्जुन मत्रे यांनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पती संतोष व सासू कौशल्या या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक टी. बी. कोल्हे यांनी तपास करुन दोषारोपपत्र दाखल केले.

Story img Loader