ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी सुरू केलेल्या चुंबळी येथील हंगामी वसतिगृहातील १०० मुलांना बुधवारी सकाळी जेवणातून विषबाधा झाली. यात दोन शिक्षक व तीन स्वयंपाकी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील गंभीर १७ मुलांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जावळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली.
पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथे सर्वशिक्षा अभियानांतर्गत ऊसतोडणी मुलांसाठी सरकारने हंगामी वसतिगृह सुरू केले आहे. येथे जवळपास १०० मुले असून, त्यात ४६ मुली आहेत. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास बाजरीची भाकरी व बटाटय़ाची भाजी असे जेवण या मुलांना देण्यात आले, मात्र काही वेळातच मुलांना पोटात मळमळ व उलटीचा त्रास होऊ लागला. मुख्याध्यापक खाडे यांनी तात्काळ या मुलांना पाटोदा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दवाखान्यात एकच गोंधळ उडाला. ७ ते १५ वयोगटांतील मुलांच्या ओरडण्याने वातावरण सुन्न झाले होते. मात्र, माहिती मिळताच डोंगरकिन्ही तालुक्यातील सर्वच आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांनी पाटोद्याकडे धाव घेतली व मुलांवर उपचार सुरू करण्यात आले. यातील गंभीर १७ मुलांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वाची प्रकृती चांगली असल्याचे सूत्रांनी सांगितले. सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी जावळेकर यांनी भेट दिली. पोलिसांनी भाजी व भाकरीचे नमुने ताब्यात घेतले असून विषबाधेचा तपास करीत आहेत.

Story img Loader