कल्याण-डोंबिवलीकरांच्या नशिबी शरपंजरी रस्ते
कल्याण-डोंबिवली पालिकेने मागील १५ वर्षांत शहरातील रस्ते तयार करणे आणि त्यावर डागडुजी करण्यासाठी आतापर्यंत सुमारे १०३ कोटी रुपयांचा खर्च केल्याची माहिती पुढे येत आहे. १०० कोटी रुपयांची उड्डाणे घेऊनही कल्याण आणि डोंबिवली अशा दोन्ही शहरांमधील रस्ते वारंवार शरपंजरी का पडतात, असा सवाल येथील रहिवाशांना सतावू लागला आहे. या काळात महापालिकेत शिवसेना-भाजपची एकहाती सत्ता आहे. निवडणुकांच्या तोंडावर या पक्षांचे नेते खड्डेमुक्त शहराचे आश्वासने येथील मतदारांना देतात. प्रत्यक्षात मात्र कोटय़वधी रुपये खर्च करूनही खड्डे जैसे थे असल्याचा अनुभव येथील रहिवाशी घेत आहेत. तब्बल १३ वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त श्रीकांत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली एकात्मिक रस्ते विकास टप्पे प्रकल्प राबविण्यात आला. या प्रकल्पानंतरही रस्त्यांची दैना झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. रस्ते कामासाठीच्या निविदा निघाल्या. त्यामधील शंभर टक्के रक्कम रस्ते कामांसाठीच खर्च झाली असती तर १५ वर्षांपूर्वी तयार केलेले रस्ते अद्याप चांगले राहिले, असते असा दावा महापालिकेतील एका वरिष्ठ अभियंत्याने वृत्तान्तशी बोलताना केला. मात्र टक् केवारीच्या राजकारणात रस्त्यांची कामे आणि त्यावर झालेला कोटय़वधी रुपयांचा खर्च अक्षरश: वाहून गेला, अशी टीका आता महापालिका वर्तुळात होत आहे. महापालिका अस्तित्वात आल्यापासून वरिष्ठ अभियंत्यांनी रस्त्यांची रूपरेषा तयार करण्यासाठी भूमि अभिलेख विभागाबरोबर संयुक्त मोजणी करून घेतली नाही. त्यामुळे अनेक रस्ते हे आजही खासगी मालकीत आहेत. सार्वजनिक ठिकाणी तयार करण्यात आलेले रस्ते शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले नाहीत. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणातही अनेक ठिकाणी अडचणी उभ्या राहिल्या आहेत. १९९५ ते २०१० या कालावधीत नवीन रस्ते तयार करण्यासाठी ५० कोटी ३ लाख १० हजार खर्च करण्यात आला. त्याशिवाय रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सुमारे ३५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याच कालावधीत रस्ते दुरुस्त करण्यासाठी ५३ कोटी ६६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. रस्ते, खड्डे दुरुस्तीसाठी दरवर्षी सुमारे ७ ते ८ कोटी रुपये मंजूर केले जातात, अशी माहिती आहे. यासंबंधी महापालिकेतील अभियंता विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता याशिवाय बोलण्यासाठी वरिष्ठ अधिकारी तयार नसल्याचे दिसून आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा