सोलापूर जिल्ह्य़ातील पाण्याच्या गंभीर प्रश्नासह शेतक ऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी जिल्ह्य़ात पंढरपूर, टेंभुर्णी, मंगळवेढा, नातेपुते, करमाळा आदी पंधरा ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. यात पोलिसांनी हस्तक्षेप करून शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात संघटनेचे प्रदेश सचिव संजय पाटील-घाटणेकर यांच्यासह सुमारे शेतकरी दोनशे कार्यकर्त्यांचा सहभाग होता. या आंदोलनामुळे रस्त्यावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. त्यामुळे अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. तत्पूर्वी, सदाशिव खोत यांनी आपल्या भाषणात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य बनविले. सोलापूर जिल्ह्य़ातील उजनी धरणाचे पाणी उद्योगासाठी बारामतीला पळविण्याचा घाट पवार काका-पुतण्यांनी घातला आहे. पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करीत असून देखील संपूर्ण सोलापूर जिल्ह्य़ावर अन्याय करीत आहेत. या जिल्ह्य़ातील जनता गुलामासारखी सारेकाही सहन करीत आहे. जनतेने आता पेटून उठण्याची गरज आहे. त्याशिवाय आपल्यावरील अन्याय दूर होणार नाही, असे खोत यांनी सांगितले.
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भोसले यांनी रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व केले. तर  पंढरपूर, माढा, करमाळा, नातेपुते आदी मिळून पंधरा ठिकाणी शेतक ऱ्यांनी एकत्र येऊन पाणी प्रश्नावर रास्ता रोको केला. करमाळय़ात झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व महेश चिवटे व विवेक येवले यांनी केले.

Story img Loader