शंभर कोटी क्लबमधले किती?.. म्हणजे ‘रेस २’, ‘ग्रँड मस्ती’, ‘भाग मिल्खा भाग’.. बस् एवढेच! नाही.. मग काही दोनशे कोटी क्लबमध्ये आहेत तर जवळपास निम्मे चित्रपट हे ५० ते १०० कोटींच्या मधले आहेत मग त्यांचा एक छोटा वेगळा क्लब करायचा का?.. अगदी बोटे मोजत मोजत सुरू असलेली ही आकडेवारी
आशय-तंत्राच्या बाबतीत वेगाने बदलणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांनी या वर्षी तिकीटबारीवर अक्षरश: कोटींची कमाल केली आहे. शंभरपेक्षाही जास्त चित्रपट प्रदर्शित झाले असले तरी या यादीत तब्बल सहा चित्रपटांनी शंभर कोटींच्या आसपास कमाई केली आहे. आणि यादीतील जवळपास अध्र्याहून जास्त चित्रपट हे पन्नास कोटींच्या वर कमाई केलेले आहेत तर अगदी कमीतकमी बजेटमध्ये बनवलेल्या चित्रपटांनीही २६ ते ३० कोटींचा गल्ला जमवला आहे. कोणत्याही सिक्वल्स आणि रिमेकचा आधार नसतानाही केवळ चित्रपटांचे विषय, तरुण दिग्दर्शकांची अभिनव मांडणी, कलाकारांचा चोख अभिनय आणि मार्केटिंग-प्रसिद्धी तंत्राचा केलेला पुरेपूर वापर यामुळे गेल्या वर्षीपेक्षा हजार कोटींची वाढ या वर्षीच्या व्यवसायात अपेक्षित असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या सगळ्या गणितांना आणि अपेक्षांना सुरुवात झाली आहे ती सध्या सगळीकडे हाऊसफुल्ल गर्दीत सुरू असणाऱ्या क्रिश ३ या चित्रपटामुळे. आठवडय़ाच्या आत या चित्रपटाने देशभरात १६६ कोटींची कमाई केली आहे. ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार परदेशातही ‘क्रिश ३’ला चांगला प्रतिसाद मिळाला असून तिथेही ३६ कोटींचा व्यवसाय केला आहे. दोन्हीकडची आकडेवारी एकत्र केली तर आठवडय़ाभरात ‘क्रिश ३’ने ह्रतिक रोशनला २०० कोटी क्लबचा धनी केले आहे. ‘क्रिश ३’ला जर एवढा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असेल तर वर्षांच्या अखेरीस प्रदर्शित होणाऱ्या ‘धूम ३’ चित्रपटालाही तितकाच चांगला प्रतिसाद मिळेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.
‘क्रिश ३’ आणि ‘धूम ३’च्या प्रदर्शनात आठ आठवडय़ांचे अंतर आहे. आणि यामध्ये संजय लीला भन्साळी दिग्दर्शित दीपिका-रणवीर यांची मुख्य भूमिका असलेला ‘रामलीला’ हा दुसरा बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यापाठोपाठ करीना आणि इम्रानचा ‘गोरी तेरे प्यार में’, सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेला तिग्मांशू धुलिया दिग्दर्शित ‘बुलेट राजा’ आणि शाहीद कपूरची मुख्य भूमिका असलेला प्रभुदेवा दिग्दर्शित ‘आर. राजकुमार’ असे चार चांगले चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे वर्षांच्या उत्तरार्धात अजून ५०० कोटींच्या आसपास बॉलिवूडचे चित्रपट व्यवसाय करतील, असा अंदाज ट्रेड विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. सहारा मोशन पिक्चर्सचे वितरण प्रमुख आणि ट्रेड विश्लेषक गिरीश जोहर यांनी ट्विटरवर दिलेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबपर्यंत बॉलिवूडने २२०० कोटींची कमाई केली आहे.
पुढच्या दोन महिन्यांत प्रदर्शित होणाऱ्या ५ चित्रपटांनी जर ५०० कोटींच्या आसपास व्यवसाय केला तर ही आकडेवारी थेट २७०० कोटींच्या आसपास पोहोचेल. गेल्या वर्षीपेक्षा ही आकडेवारी फार मोठी असून पुढच्या वर्षी तर आघाडीच्या कलाकारांना २०० कोटींचे उद्दिष्ट समोर ठेवूनच तयारी करावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या वर्षी, जवळपास सहा ते सात चित्रपटांनी शंभर कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केल्यामुळेच ही मजल गाठता आली आहे, असे मत जोहर यांनी व्यक्त केले आहे. ‘क्रिश ३’ आणि ‘धूम ३’ यांच्या स्पर्धेतून पुढच्या वर्षीची बॉलिवूडची नवी समीकरणे निश्चित होणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा