राज्यातील १०२ पोलीस निरीक्षकांना उपअधीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. लातूरच्या पोलीस प्रशिक्षण विभागातील गोपीनाथ पाटील व परभणीचे दत्तात्रय वाळके यांच्यासह मराठवाडय़ातील तीन अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.
गेल्या दोन वर्षांपासून निरीक्षकांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. सर्व अडथळे पार केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी गृह विभागाने पदोन्नतीचे आदेश जारी केले आणि १०२ अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला. लातूर जिल्ह्य़ातील बाभुळगाव पोलीस प्रशिक्षण विभागातील गोपीनाथ पाटील यांची पुणे येथे, परभणीचे दत्तात्रय वाळके यांची औरंगाबाद तर औरंगाबादचे प्रताप बावीस्कर यांची नंदूरबार उपविभागात बदली झाली.
मराठवाडय़ातील अनेकजण पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते. पण केवळ तिघांनाच पदोन्नती मिळाली. राज्याच्या अन्य भागांतून मराठवाडय़ात ८ अधिकारी येत आहेत. नाशिकचे प्रवीण कुलकर्णी औरंगाबाद येथे, बृहन्मुंबईच्या लता दोंदे यांची जालना येथील पोलीस प्रशिक्षण विद्यालयात, नाशिकचे ईश्वर बसावे यांची जालना मुख्यालय, बृहन्मुंबईचे रामचंद्र मांडुरके यांची सिल्लोड उपविभाग, सुखदेव चौगुले नांदेड गुप्त वार्ता विभागात अतिरिक्त आयुक्त म्हणून, बृहन्मुंबईचेच भास्कर पिंगट औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तर अकोला येथे दहशतवादविरोधी पथकात कार्यरत असलेले केशव पार्तोड यांची औरंगाबाद येथे सहायक आयुक्त म्हणून पदोन्नतीवर बदली झाली. आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. के. उपाध्याय यांच्या सहीने जारी झालेल्या आदेशात अधिकाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करावे, असे स्पष्ट केले आहे. पदोन्नती झालेल्यांमध्ये बहुतांश अधिकारी मुंबई, ठाणे विभागात कार्यरत आहेत.