दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षी २४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान आयोजित यशवंत कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे यंदा दशकपूर्ती वर्ष दिमाखात साजरे करीत आहे. यावर्षीचे प्रदर्शन हायटेक करण्याचे नियोजन असून, या पाश्र्वभूमीवर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली.
बैठकीला अपर कृषी सहसंचालक नारायण शिसोदे, कृषी विकास अधिकारी विजय माईनकर, आमदार बाळासाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती दाजी पवार, प्रकाश पाटील-सुपनेकर, पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती निलम पाटील-पार्लेकर, उपविभागीय कृषी अधिकारी शरद दोरगे, तालुका कृषी अधिकारी शिवप्रसाद मांगले, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आबासाहेब पवार, पोलीस निरीक्षक संजय सुर्वे, वीज कंपनीचे स्वप्नील जाधव यांच्यासह बाजार समितीचे पदाधिकारी, अधिकरी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
डॉ. रामास्वामी एन. यांनी पाणी व्यवस्थापन, साखळी सिमेंट बंधारे, ठिबक सिंचन यावर प्रदर्शनात भर देण्यात यावा अशा सूचना केल्या. शरद दोरगे यांनी कृषी विभागातर्फे नियोजित दालनांची माहिती दिली. संयोजकांनी यावर्षी आधुनिक शेती तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे परदेशी स्टॉल प्रदर्शनात लावण्यात येणार असल्याचे सांगून यासाठी नेदरलँड, इटली, हॉलंड, डेन्मार्क येथील कृषी तंत्रज्ञान प्रदर्शनात शेतकऱ्यांना पहावयास मिळणार असल्याचे सांगितले. आधुनिक शेती तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन, ठिबक सिंचन यावर यावर्षी अधिक भर देण्यात आला आहे. इटली, नेदरलँड, डेन्मार्क, हॉलंड येथील वीस स्टॉल प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. दरम्यान मागील वर्षांच्या त्रुटी दूर करून प्रदर्शन व्यापक करा अशा सूचना बैठकीत अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढत आहे. शेतकऱ्यांमध्ये जिज्ञासा वाढीस लागावी अशी भूमिका मांडण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा