विदर्भात उजव्या सोंडेचा गणपती म्हणून ख्यात असलेल्या येथील प्र.मा. रुईकर ट्रस्टच्या मालकीच्या जिनिंग-प्रेसिंगच्या आवारात असलेल्या गणपती मंदिराची ओळख ‘जिनातला गणपती’ अशीच गेल्या ११० वर्षांपासून आहे. संगमरवरी दगडाची उजव्या सोंडेची अतिशय आकर्षक गणेश मूर्ती ही विदर्भ-मराठवाडय़ातील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान आहे.
यवतमाळ-धामणगाव मार्गावर एस.टी. बसस्थानकापासून साधारण तीन कि.मी. अंतरावर उत्तरेला असलेल्या रुईकर ट्रस्टच्या विस्तीर्ण जागेवर गणपतीचे फार प्राचीन मंदिर असून एकेकाळी अडगळीत असलेल्या मंदिराचा एवढा प्रचंड कायापालट झाला आहे की, यवतमाळात एवढे सुंदर, पॉश, मोकळी खेळती शुद्ध हवा, सूर्यप्रकाश आणि आजूबाजूला बागबगिच्यांनी सजलेले गणपतीचे एकही मंदिर नाही, असे म्हटल्यास चूक ठरू नये.
मंदिरातील अडीच फू ट उंच व दीड फूट रुंद अशा या रेखीव मूर्तीचे दर्शन घेताना प्रत्येकाला आध्यात्मिक शक्तीच्या अनुभूतीची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. १९०२ साली धामणगाव रेल्वे येथील जयरामदास भागचंद शेठ यांनी यवतमाळ येथे जिनिंग फॅक्टरीसाठी जागा घेतली. त्याचवेळी त्यांनी फॅक्टरीच्या आवारात गणपती मंदिर बांधले. त्यानंतर १९३६ साली प्रल्हाद माधोबा रुईकरांनी हा जीन विकत घेतल्यानंतर त्यांनी गणेश पूजनाची स्वतंत्र व्यवस्था ठेवली. रुईकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्युपत्रानुसार प्र.ना. रुईकर ट्रस्टची स्थापना झाली व हे मंदिर या ट्रस्टकडे आले. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. उदय नावलेकर, विश्वस्त मनोहर तायडे आणि अॅड. श्रीपाद भालेराव यांनी लाखो रुपये खर्च करून अभूतपूर्व असा मनमोहक कायापालट करून यवतमाळकरांच्या श्रद्धेला साजेसे कर्तव्य याचवर्षी जानेवारीत पूर्ण केले. या मंदिराला शंकराचार्य, हृदयनाथ मंगेशकर व इतर अनेक संगीतकार, कीर्तनकार, वक्ते व समाजसेवकांनी भेटी देऊन सेवा रुजू केली आहे. गणेशोत्सव, गणेश जयंती, संकष्टी व विनायकी चतुर्थी या काळात ट्रस्टतर्फे गणपतीच्या मूर्ती व छायाचित्र प्रदर्शन, अन्नदान, भक्तीसंगीताचे कार्यक्रम साजरे केले जातात. मनोकामना पूर्ण करणारा जीनातला गणपती असल्याची हजारो भाविकांची श्रद्धा आहे.
उल्लेखनीय म्हणजे, मंदिर परिसरातील दीडशे वर्षांपूर्वीचे पिंपळाचे झाड आता मंदिराच्या सभागृहात घेण्यात आले आहे. याच सभागृहात विठ्ठल रुक्मिणीचे अत्यंत सुंदर छोटेखानी मंदिरही बांधण्यात आले आहे. मंदिराला लागून बाराही महिने पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. सुमारे दहा हजार चौरस फूट जागेत हे मंदिर उभे असून, सोळाशे चौरस फुटांचे देखणे नवीन बांधकाम याचवर्षी जानेवारीत पूर्ण करण्यात आले आहे. मंदिर परिसरात सुंदर हिरवळ, मनमोहक बागबगिचे, मंदार, जास्वंद, शमी, पिंपळ इत्यादी वृक्ष आणि भाविकांसाठी दर्शनाची विशेष व्यवस्था, कीर्तन-प्रवचन, व्याख्यानमाला यासाठी सुशोभित भव्य सभागृह, तसेच गोरक्षणसारख्या सामाजिक उपक्रमांमुळे जिनातला गणपती विदर्भात प्रसिद्ध आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा