जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महापालिका, जिल्हापरिषद आणि नगरपरिषद सदस्यांचे एकूण ४० जागांसाठी १११ अर्ज आले असून आता नियोजन समितीमध्ये वर्णी लावण्यासाठी विविध राजकीय पक्षांची समीकरणे सुरू झाली आहे.
जिल्हा नियोजन समितीची निवडणूक २० फेब्रुवारीला होणार असल्यामुळे शुक्रवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कोणत्या सदस्यांची वर्णी लावायची यासाठी प्रत्येक पक्षांमध्ये चढाओढ सुरू होती.  जिल्हा नियोजन समितीमध्ये महापालिकेतून २०, जिल्हा परिषदेतून १७ आणि नगरपालिकेतून ३ अशा ४० सदस्यांची निवड केली जाते. आज सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयात सदस्यांनी गर्दी केली होती. महापालिकेतून नागपूर शहर आघाडीतर्फे जगदीश ग्वालबंशी, सारिका नांदूरकर, राजू लोखंडे, अस्लम खान, हरिश दिकोंडवार, परिणय फुके, मनीषा कोठे, रश्मी फडणवीस, दिव्या धुरडे, अल्का दलाल, अश्विनी जिचकार, मिना तिडके, संगीता कळमकर, जयश्री वाडिभस्मे, अनिता वानखेडे, सरोज बहादुरे, संजय बालपांडे, बंडू राऊत, रमेश पुणेकर, बाल्या बोरकर, सतीश होले, सुनील अग्रवाल आणि संदीप जोशी. काँग्रेसकडून आभा पांडे, सुजाता कोंबाडे, अरुण डवरे, मालू वनवे, महेंद्र बोरकर, दीपक कापसे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुनेश्वर पेठे आणि बहुजन समाजपक्षाकडून किशोर गजभिये यांनी अर्ज भरले. जिल्हा परिषदेतून नाना कंबाले, मनोहर कुंभारे, उपासराव भुते, मनोज तितरमारे, संध्या गावंडे, नंदा नारनवरे, शांता कुमरे, उज्ज्वला बोराडे, चंद्रशेखर चिखले (काँग्रेस- राष्ट्रवादी) मुकेश चव्हाण, जयकुमार वर्मा, कमलाकर मेंघर, विजय देशमुख, प्रेम झाडे, विजय देशमुख, अंबादास उके, शुभांगी गायधने, शकुंतला इरपाते, छाया ढोले, निशा सावरकर (भाजप), भारती गोडबोले (शिवसेना) आणि नगरपरिषदमधून रणजित सरायकर, गंगाधर रेवतकर, अनिल साठवणे, पुष्पा कारगावकर यांनी अर्ज भरले आहेत.   जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात ४ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजेपासून अर्जाची छाननी होणार आहे.  ५ फेब्रुवारीला वेध अर्जाची यादी प्रसिद्ध होईल. ज्या कोणाचा अवैध अर्जावर आक्षेप असेल अशांना अपील करण्याची पुन्हा संधी देण्यात येईल. ७ फेब्रुवारी ही अपील करणाऱ्या उमेदवारांसाठी तारीख असून ९ फेब्रुवारीला अपील  निर्णयाची सुनावणी होईल. त्यानंतर ११ फेब्रुवारीला वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि १२ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे.
शेवटी १३ फे ब्रुवारीला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होऊन २० फेब्रुवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होईल. राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांना सात दिवसांचा कालावधी प्रचारासाठी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात २२ फेब्रुवारीला सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. महापालिकेसाठी २, जिल्हा परिषदेसाठी १ आणि नगर परिषदेसाठी ४ मतदान केंद्रे आहे.