अमरावती महसूल विभागाने १०० टक्क्यांहून अधिक महसूल वसूल करण्याची कामगिरी चालू वर्षांत केली आहे. महसूल आयुक्त आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी काटेकोर नियोजन केल्याने १११ टक्के महसूल गोळा करण्यात विभागाला यश आले आहे, अशी माहिती महसूल उपायुक्त रवींद्र ठाकरे यांनी दिली आहे.
अमरावती जिल्हा प्रशासनाला २०१२-१३ या आर्थिक वर्षांत ५५ कोटी ९५ लाख रुपयांचे उद्दिष्ट होते. जिल्हा प्रशासनाने या उद्दिष्टापेक्षा अधिक ६५ कोटी रुपये म्हणजे ११६ टक्के वसुली केली आहे. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शंभर टक्क्यांहून अधिक महसूल गोळा करण्यात यश मिळाले आहे. अकोला जिल्हा प्रशासनासमारे ३१ कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट होते. यंत्रणेने ३१ कोटी ४८ लाख रुपयांची वसुली केली आहे. ही टक्केवारी १०५ टक्के आहे. यवतमाळ जिल्ह्य़ाला ४४ कोटींचे उद्दिष्ट होते. ५० कोटी ६३ लाख रुपयांचा महसूल गोळा करण्यात यवतमाळ जिल्हा महसूल विभागाला यश मिळाले आहे. वसुलीची टक्केवारी ११५ टक्क्यांवर पोहोचली आहे. बुलढाणा जिल्हा प्रशासनाने १११ टक्के वसुली केली आहे. प्रशासनासमोर ३६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. ४० कोटी रुपयांची वसुली झाली. वाशीम जिल्ह्य़ासाठी २० कोटींचे उद्दिष्ट होते. २० कोटी ८८ लाख रुपयांची वसुली झाली. ही टक्केवारी १०४ टक्क्यांपर्यंत पोहोचली.
अमरावती विभागाने १८६ कोटी महसूल गोळा करण्याच्या उद्दिष्टाच्या तुलनेत २०८ कोटी रुपयांची वसुली करून १११.३६ टक्के वसुलीची सरस कामगिरी केली आहे. या वसुलीत गौण खनिज आणि करमणूक कर वसुलीचाही समावेश आहे. गौण खनिजांच्या बाबतीत अमरावती जिल्हा प्रशासनाने १२४ टक्के वसुली करून शासनाला ४७ कोटी ४३ लाख रुपयांचा महसूल मिळवून दिला आहे. अकोला जिल्हा प्रशासनाने ८३ टक्के वसुली करून १७ कोटी रुपये, यवतमाळ जिल्ह्य़ातून ७९ टक्क्यांनुसार २६ कोटी, बुलढाणा १०४ टक्क्यांने २७ कोटी, तर वाशीम जिल्हा प्रशासनाने ७७ टक्के वसुली करून १० कोटी रुपये महसूल एकत्र केला आहे. करमणूक कर वसुलीत अकोला, यवतमाळ जिल्हा प्रशासनाने अनुक्रमे ३ कोटी ९८ लाख आणि २ कोटी ५७ लाख रुपयांची उद्दिष्टापेक्षा १०० टक्के वसुली केली आहे. बुलढाणा जिल्ह्य़ात ८८ टक्के करमणूक कर गोळा झाला आणि १ कोटी ९८ लाख रुपये तिजोरीत पोहोचले. अमरावतीत ८५ टक्के वसुली ४ कोटी २९ लाख रुपयांचा कर, तसेच वाशीम जिल्हा प्रशासनाने ६७ टक्क्यांनी ८१ लाख रुपयांची वसुली केली आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, अकोल्याचे अशोक शिंदे, यवतमाळचे अश्विन मुदगल, बुलढाण्याचे के.व्ही. कुरूंदकर, वाशीमचे रामचंद्र कुळकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, ए.आर. खंडागळे, आर.बी. देशममुख, बी. के. इंगळे, राजेश खवले, तसेच उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा १०० टक्के महसूल गोळा झाला आहे, असे महसूल उपायुक्त रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

Story img Loader