ठाणे शहरातील मोठमोठय़ा बिल्डरांच्या गृहप्रकल्पांसाठी वाट मोकळी करून देण्यासाठी आणलेले वृक्षतोडीचे प्रस्ताव आधीच वादग्रस्त ठरलेले असतानाच वर्तकनगर भागातील रस्ता तसेच गटारांच्या बांधकामासाठी ११५ वृक्षांची तोड करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून त्यासाठी नागरिकांच्या हरकती मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र रस्ते आणि गटारांच्या कामामध्ये बाधीत होणारी वृक्ष जुनी आणि मोठी असल्यामुळे त्यास नागरिकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. तसेच महापालिकेच्या निर्णयामुळे शहरातील वृक्षप्रेमींमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.
शहरातील मोठमोठय़ा बिल्डरांना वृक्षतोडीसाठी ना हरकत दाखला देण्यामध्ये राजकीय हितसंबंध गुंतल्याची चर्चा होती. शिवसेनेच्या एका माजी महापौराने त्या प्रस्तावात विरोधही केला होता. त्यामुळे या प्रस्तावाविषयी खुद्द शिवसेनेच्या काही नगरसेवकांमध्ये अस्वस्थता होती. महापालिकेतील ठरावीक टोळी यासाठी कार्यरत असल्याचीही चर्चा महापालिका वर्तुळात आहे. तसेच या वृक्षतोडीमागच्या ‘अर्थ’कारणाविषयीही महापालिकेत जोरदार चर्चा आहे. दक्ष नागरिकांनी आक्षेप घेत या संदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यामुळे महापालिकेमार्फत सर्वसाधरण सभेमध्ये मंजुरीसाठी आणलेले वृक्षतोडीचे प्रस्ताव वादग्रस्त ठरलेले होते. असे असतानाच आता महापालिका प्रशासनाचे वर्तकनगर भागातील म्हाडा वसाहतीतील रस्ता आणि गटरांच्या बांधकामासाठी मोठमोठे ११५ वृक्ष तोडण्याचा निर्णय घेतला आहे. विकास कामांच्या आड हे वृक्ष येत असले तरी त्यास नागरिकांकडून विरोध होण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भात ठाण्यातील दक्ष नागरिक चंद्राहास तावडे यांच्याशी संपर्क साधला असता, विकास कामात प्रत्यक्षात किती वृक्ष बाधीत होतील आणि त्यातील जास्तीत जास्त किती वाचविता येऊ शकतात, हे पाहणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.
वृक्षांची नावे व संख्या..
अशोक -१२, बदाम- १४, गुलमोहर- १०, जांभूळ-३, विलायती चिंच-१, पेरू-२, नीम-२, नारळ-२३, उंबर-८, सीताफळ-३, अकेशिया -२, सूरू- १, आंबा – ३, सुपारी – १, सुकलेले -२, रेन्ट्री – ३, केशीया – २, करंज- २, पांगरा – १, पेल्टोफोरम – ६, फणस- १, सिंगापुरी चेरी – २, अडुळसा – १, अनंता – ३, सातवीन – ४, स्पॅथोडिया – ३, बिट्टी – १ असे एकूण ११५ वृक्षांची तोड करण्यात येणार आहे.
रस्ते, गटारांसाठी ११५ वृक्षांचा बळी?
ठाणे शहरातील मोठमोठय़ा बिल्डरांच्या गृहप्रकल्पांसाठी वाट मोकळी करून देण्यासाठी आणलेले वृक्षतोडीचे प्रस्ताव आधीच वादग्रस्त ठरलेले असतानाच
First published on: 14-02-2014 at 07:10 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 115 trees cut for roads drainage