१० जानेवारीपासून सुरू झालेल्या यंदाच्या ११ व्या महोत्सवाचा घेतलेला हा आढावा..
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणारे पुणे शहर हे पूर्वीपासून विद्येचे माहेरघर, उद्योगनगरी, क्रीडानगरी म्हणून ओळखले जात होते. आता पुणे उद्याननगरी, पर्यटननगरी, आयटी-बीटी सिटी, ऑटोहब आणि महोत्सवांचेही शहर बनले आहे. सवाई गंधर्वसारख्या अभिजात संताचा महोत्सव याच पुण्यात हीरकमहोत्सव साजरा करतो. तर पुणे फेस्टिवलसारखा सांस्कृतिक महोत्सव यंदा रौप्यमहोत्सव साजरा करीत आहे. पुण्याच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेत अशीच मोलाची भर टाकणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा ११ वे वर्ष साजरे करीत आहे.
पुण्यात फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, अनेक फिल्म क्लब्स, मल्टिप्लेक्स याबरोबरच तरुणांची संख्या फार मोठी आहे. चित्रपट महोत्सव सुरू करायला ही निश्चितच योग्य भूमी होती. पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांनी २००२ मध्ये पुण्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्याचे योजिले आणि त्यांना मोलाची साथ मिळाली प्रख्यात दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची! महोत्सवाच्या पहिल्या वर्षी सारे काही नवीन असूनही नियोजन चांगले झाले आणि पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसादही लाभला. पहिल्याच वर्षी १५०० च्या आसपास प्रतिनिधी नोंदणी झाली होती. कालौघात हा प्रतिसाद वाढत राहून मागील वर्षी तर १० हजार नावनोंदणीचा टप्पा ओलांडला गेला. यावरूनच या चित्रपट महोत्सवाला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादाची प्रचिती येते.
प्रभात फिल्म कंपनीच्या ७५ व्या वर्षांनिमित्त महाराष्ट्र सरकारने या चित्रपट महोत्सवात दिले जाणारे तीन महत्त्वपूर्ण पुरस्कार सुरू केले. प्रभात सवरेत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट (१० लाख रुपये), प्रभात सवरेत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक (५ लाख रुपये) आणि पाठोपाठ संत तुकाराम सवरेत्कृष्ट मराठी चित्रपट (५ लाख रुपये) हे पुरस्कार सुरू झाले. पुढे महाराष्ट्र शासनाचा हा अधिकृत चित्रपट महोत्सव म्हणून गणला जाऊ लागला. आता पुणे फिल्म्स फाऊण्डेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते.
महोत्सवास महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक
खाते, भारत सरकारचे माहिती व प्रसारण मंत्रालय, डायरेक्टोरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल- भारत सरकार, पुणे महानगरपालिका, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, मॅक्सम्युलर भवन, अलियान्स दी फ्रान्से, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, एनएफडीसी, फिल्म्स डिव्हिजन, एअर इंडिया, व्हिसिलग वुड्स इंटरनॅशनल, इन्को, भारतातील विविध देशांचे दूतावास अशा अनेक संस्था सहकार्य करतात.
दरवर्षी चित्रपट महोत्सवामध्ये दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटांची संख्या वाढत आहे. तसेच स्क्रीन्सची संख्याही वाढत आहे. यंदा हे चित्रपट पुण्यातील सिटी प्राइड-कोथरूड, सिटी प्राइड- आर डेक्कन, सिटी प्राइड अभिरुची- सिंहगड रोड, सिटी प्राइड- सातारा रोड, ई-स्क्वेअर-गणेशिखड रोड, पीवीआर सिनेमाज- नगर रोड व एनएफएआय- लॉ कॉलेज रोड अशा एकूण ७ ठिकाणी ११ स्क्रीनवर हे चित्रपट दाखवले जात आहेत.
जागतिक चित्रपट, मराठी चित्रपट आणि विद्यार्थी चित्रपट या स्पर्धात्मक विभागाबरोबरच वल्र्ड सिनेमा, ट्रिब्यूट, रेट्रोस्पेक्टिव्ह, इंडियन सिनेमा अशा विविध विभागांमध्ये या वर्षी २०० हून अधिक चित्रपटांचे ३५० स्क्रििनग होत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय ज्युरी, निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, कलावंत, तंत्रज्ञ, समीक्षक, चित्रपट शिक्षणातील विद्यार्थी, त्यांची मोठी हजेरी या चित्रपट महोत्सवाला लाभत आहे.
चित्रपट क्षेत्रात प्रदीर्घ योगदान देणाऱ्या दोन व्यक्तींचा दरवर्षी या चित्रपट महोत्सवात सन्मान केला जातो. यंदाच्या या सन्मानाचे मानकरी ज्येष्ठ अभिनेता जितेंद्र व ज्येष्ठ अभिनेते रमेश देव होते. यापूर्वी मृणाल सेन, दिलीप कुमार, लता मंगेशकर, देव आनंद, वहिदा रेहमान, शक्ती सामंता, वैजयंती माला, यश चोप्रा, आशा पारेख, धर्मेद्र, शर्मिला टागोर, शम्मी कपूर, शशी कपूर, सुलोचना दीदी, हेमा मालिनी, डॉ. श्रीराम लागू, राजेश खन्ना, शशिकला, सायरा बानू, अमिताभ बच्चन आणि आशा भोसले यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
या चित्रपट महोत्वसात दिल्या जाणाऱ्या ‘सचिन देव बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अ‍ॅण्ड साऊंड’ हा पुरस्कार यंदा ‘शिवहरी’ पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा आणि पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना दिला गेला. यापूर्वी ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल, प्रख्यात संगीतकार खय्याम आणि इलय राजा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
प्रख्यात दिग्दर्शक व निर्माते सुभाष घई यांच्या व्हिसिलग वुड्स इंटरनॅशनलतर्फेही विद्यार्थी चित्रपट स्पर्धा आयोजित केली जाते. विद्यार्थ्यांपैकी दिग्दर्शक, पटकथा संवाद लेखक, सिनेमोटोग्राफी, अ‍ॅनिमेशन फिल्म्स अशा विविध विभागांत उत्तम कामगिरी करणाऱ्यांना या चित्रपट महोत्सवात पुरस्कृत केले जाते. एका अर्थाने हा प्रज्ञाशोधच मानावा लागेल. याबरोबरच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फेदेखील दिग्दर्शन, सिनेमोटोग्राफी, पटकथा संवाद लेखन आदींसाठी पुरस्कार दिले जातात.
अशा चित्रपट महोत्सवाचे फलित काय, असा प्रश्न नेहमी विचारला जातो.
पुण्यातील हा चित्रपट महोत्सव बघितला तर त्याचे उत्तर आपोआप मिळते. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किर्तीच्या दिग्दर्शक कलावंतांबरोबर परस्पर संवाद वाढणे, दर्जेदार चित्रपट बघण्याची संधी मिळणे हे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच महत्त्व अशा महोत्सवांमुळे चित्रपट क्षेत्राला चांगली दिशा मिळण्यातही होतो. या चित्रपट महोत्सवात विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला, प्रदर्शने, परिसंवाद यांमुळेदेखील वैचारिक आशयसंपन्नता वाढते हेदेखील फार मोठे फलित मानावे लागेल. उत्तरोत्तर वाढत चाललेला हा चित्रपट महोत्सव अधिक दर्जेदार व्हावा यासाठी पुणे फिल्म फाऊण्डेशनचे सर्व विश्वस्त महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने सतत  प्रयत्नशील असतात. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा