दिनदर्शिकेतील तारखेनुसार शंभर वर्षांनंतर येणाऱ्या १२:१२:१२ या दुर्मीळ योगाचे औचित्य साधून खान्देशातील ज्येष्ठ कवी रामदास वाघ लिखीत १२ अहिराणी पुस्तकांचे १२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजून १२ मिनिटांनी प्रकाशन करण्यात येणार आहे.
अहिराणी भाषेत असा कार्यक्रम प्रथमच होत असल्याने साहित्य क्षेत्राचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागून आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार यांसह नाशिक जिल्ह्य़ातील ‘कसमादे’ परिसरात अहिराणी मोठय़ा प्रमाणात बोलली जाते. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी अहिराणी भाषेतील कवितांमधून जीवनाचे तत्वज्ञान मोजक्या शब्दात मांडले आहे. त्यामुळे बहिणाबाईंची बोलीभाषा म्हणून या भाषेचा गोडवा सर्वदूर पसरलेला आहे. तो गोडवा कायम टिकून राहावा तसेच अहिराणी भाषेचा प्रचार व प्रसाराच्या चळवळीला हातभार लावण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
धुळे जिल्ह्य़ातील कापडणे येथील एच. एस. बोरसे हायस्कूलच्या प्रांगणात ज्येष्ठ समाजवादी नेते गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मराठी भाषा विभागप्रमुख प्रा. डॉ. म. सु. पगारे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. निर्मलकुमार सूर्यवंशी, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य सदाशिवराव माळी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी रामदास वाघ यांच्या ‘वानगी’, ‘सावली’, ‘शेतकरी एक जीवनकैदी’, ‘म्हातारपननी काठी’, ‘तुना काय बापनं जास?’, ‘आख्यान’, ‘सत्ता मेज जयते’, ‘माय नावाना देव’, ‘याले जीवन असं नावं’, ‘वास्तव-अवास्तव’, ‘खरं से, खोटं सांगाऊ नाही’ आणि ‘एक बिघा जमीन’ या १२ पुस्तकांचे प्रकाशन प्रा. डॉ. पगारे, प्राचार्य माळी, अॅड. सूर्यवंशी तसेच ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील आदींच्या हस्ते होणार आहे. अहिराणीप्रेमी जनतेने या कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्राजक्ता प्रकाशनच्या वतीने करण्यात आले आहे.
अहिराणी भाषेत थोडय़ा फार प्रमाणात संशोधन, ओव्या, म्हणी तसेच इतर साहित्यही प्रकाशित झाले आहे. परंतु त्याचे प्रमाण अल्प आहे. निखळ अहिराणी साहित्याची या भाषेत वानवाच आहे. जोपर्यंत अहिराणीत या बोलीच्या प्रांतातील संस्कृती, तेथील चालीरीती, परंपरा, खान्देशी माणसाच्या जगण्या-वागण्याचे कंगोरे साहित्यातून अभिव्यक्त होत नाही, तोवर अहिराणीचा प्रचार-प्रसार होणे अवघड आहे. कोंकणी, मालवणी भाषेप्रमाणे अहिराणीलाही सन्मान मिळावा. या कार्यक्रमातूना प्रेरणा व प्रोत्साहन घेऊन नवोदितांनी अहिराणीतून वस्तुनिष्ठ लेखन करण्याची गरज असल्याचे मत यानिमित्त कवी वाघ यांनी व्यक्त केले आहे.
खांडबहाले डॉट कॉमचे १२ भाषेतील शब्दकोश
१२.१२.१२ या तारखेला विशेष महत्व आहे. कारण, ही तारीख २१२१ पर्यंत कधीच येणार नाही. या विशेष तारखेनिमित्त नाशिक येथील खांडबहाले डॉट कॉमकडून १२ भाषेतील १२ शब्दकोष सर्वासाठी खुले होत आहेत. १२ भाषेतील हा डिजीटल शब्दकोश मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तामिळ, तेलगु, कन्नड, मल्याळम्, पंजाबी, बंगाली, संस्कृत आणि उर्दू भाषेत उपलब्ध होणार असून इंटरनेटच्या माध्यमातून http://www.khandbahale.com या संकेतस्थळावर सर्वासाठी मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे. जागतिक भाषा संशोधनातील या संस्थेने भारतीय भाषांसाठी घेतलेल्या पुढाकाराचा हा एक महत्वपूर्ण टप्पा असून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने या कार्याची दखल घेतली असल्याचे सुनील खांडबहाले यांनी सांगितले. १२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजून १२ मिनिटांनी संगणकाची कळ दाबून हे १२ शब्दकोष प्रकाशित केले जाणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा