तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीत सुमारे बारा लाख रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून तत्कालीन संचालक मंडळासह २६ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये विखे समर्थक कार्यकर्त्यांचा समावेश असल्याने व त्यातील काही अन्य संस्थांमध्ये महत्त्वाच्या पदांवर असल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
संस्थेचे लेखापरीक्षक बाबासाहेब पगारे यांनी अपहाराची फिर्याद काल रात्री तालुका पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये प्रवरा कारखान्याचे उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ यांच्यासह जिल्हा बँकेच्या आश्वी बुद्रुक शाखेचे शाखाधिकारी बाळासाहेब शेळके यांचा समावेश आहे. १ एप्रिल २००६ ते ३१ मार्च २०११ या पाच वर्षांच्या कार्यकाळात संचालक मंडळाने १२ लाख ५ हजार रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या कार्यकाळातील सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सचिव, कर्मचारी व जिल्हा बँकेच्या शाखाधिका-यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून अपहार केल्याचे लेखापरीक्षकांच्या तपासणीत समोर आले.
शाखाधिकारी शेळके यांनी अपात्र असलेल्या सभासदांना शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळवून देऊन संस्थेची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. याबाबतची तक्रार प्रथम संगमनेर न्यायालयाकडे करण्यात आली होती. न्यायालयाने तपासासाठी तालुका पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग केला. अधिक माहिती घेतली असता अपहाराचा आकडा हा ३५ ते ४० लाखांच्या घरात असल्याचे समजते. गेली सलग ४० वर्षे ही संस्था विखे गटाच्या ताब्यात होती. मे २०११ मध्ये झालेल्या निवडणुकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना मानणा-या कार्यकर्त्यांनी संस्थेची निवडणूक जिंकली. पूर्वीच्या संचालक मंडळाच्या कार्यकालातील व्यवहारांबाबत संशय निर्माण झाल्याने विद्यमान संचालक मंडळाच्या मागणीनुसार संस्थेचे लेखापरीक्षण करण्यात आले, त्यात घोटाळा उघडकीस आला.
भुसाळ, शेळके यांच्याखेरीज रंगनाथ उंबरकर, कैलास सारबंदे, शिवाजी भुसाळ, दत्तात्रेय भुसाळ, सुभाष निर्मळ, नानासाहेब भुसाळ, अशोक उंबरकर, तुकाराम वाणी, रमेश नेहे. भागवत उंबरकर, बाळासाहेब ब्राह्मणे, इमाम शेख, सोमनाथ पावडे आदी २६ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा