रिक्षा-टॅक्सीच्या मीटर कॅलिब्रेशनसाठी देण्यात आलेल्या मुदतीचे आता अखेरचे १८ दिवस राहिले असून मीटर उत्पादकांच्या आणि वितरकांच्या असहकारामुळे अनेक टॅक्सीचालकांना परिवहन विभागाच्या रोषाला बळी पडावे लागणार आहे. तब्बल १२ हजाराहून अधिक टॅक्सी २४ नोव्हेंबरनंतर बाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रिक्षा-टॅक्सी मीटर कॅलिब्रेशनसाठी परिवहन विभागाने हकीम समितीच्या अहवालानुसार ४५ दिवसांची मुदत दिली असून भाडेवाढीनंतर २४ नोव्हेंबपर्यंत सर्व रिक्षा-टॅक्सींना मीटर कॅलिब्रेट करण्याची मुदत देण्यात आली होती. परिवहन विभागाने २४ नोव्हेंबरनंतर कॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा-टॅक्सींवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला असला तरी प्रत्यक्षात मीटर उत्पादक आणि वितरकांकडून योग्य प्रमाणात रिक्षा-टॅक्सीचालकांना सहकार्य मिळत नसल्याचे युनियनकडून सांगण्यात येत आहे. परिवहन विभागाकडूनही मीटर उत्पादकांना तातडीने नवी मीटर्स उपलब्ध करण्याबरोबरच मीटर कॅलिब्रेट करून देण्यास सांगण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिवहन विभागाने मान्यता दिलेल्या १४ उत्पादकांपैकी एका उत्पादकाच्या मीटरमध्ये त्रुटी आढळल्यानंतर त्या उत्पादकावर बंदी घालण्यात आली आहे. तर आणखी तीन उत्पादकांच्या मीटरबाबत तक्रारी आल्यावर त्यांची तपासणी सुरू आहे. उर्वरित १० उत्पादकांचे वितरक मीटर कॅलिब्रेशनऐवजी नवी मीटर विकण्यासाठी सतत आग्रही आहेत. यामुळे काही महिन्यांपूर्वी इ-मीटर बसविलेल्या रिक्षा-टॅक्सी चालकांना आपल्या मीटरचे कॅलिब्रेशन करून घेण्यासाठी या वितरकांना मिनतवारी करावी लागत आहे. अधिकाधिक ग्राहक मिळविण्याच्या उत्पादक-वितरकांच्या या क्लुप्तीमुळे शहरातील सुमारे १२ हजार टॅक्सी बाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Story img Loader