कोल्हापूर महापालिकेने विशेष वसुली मोहीम हाती घेतलेली आहे. या अंतर्गत घरफाळा, स्थानिक संस्थाकर (एल.बी.टी.), पाणीपुरवठा, महानगरपालिका परवाना व इस्टेट विभागाकडील वसुलीसाठी एकूण १२ पथके कार्यान्वित केलेली आहेत. या मोहिमेंतर्गत आज दुसऱ्या दिवशी ४८.४८ लाख वसूल करण्यात आले.
ही मोहीम आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त संजय हेरवाडे, अश्विनी वाघमळे, सहायक आयुक्त उमेश रणदिवे, संजय सरनाईक, कर निर्धारक-संग्राहक संजय भोसले यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आली.
या पथकांव्दारे आज संपूर्ण शहरात तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. यामध्ये एकूण २६५ मिळकतींची तपासणी करण्यात आली. या तपासणीअंतर्गत घरफाळा, एल.बी.टी., महापालिका परवाना फी, पाणीपुरवठा शुल्क व इस्टेटकडील भाडे याबाबत सविस्तर तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये १६ लाख ४६ हजार इतकी रक्कम जागेवर वसूल करण्यात आली, तर महापालिकेमध्ये आज ३२ लाख २ हजार रक्कम जमा झाली. या व्यतिरिक्त महापालिकेचा परवाना नसणारे एकूण ५ व्यवसाय बंद करण्यात आले. तसेच पाणी पुरवठा शुल्काची थकबाकी असणाऱ्या १० नळ जोडण्या तोडण्यात आल्या.
महानगरपालिका राबवित असलेल्या विशेष वसुली मोहिमेंतर्गत एकूण १२ पथके कार्यरत असून प्रत्येक पथकामध्ये घरफाळा, एल.बी.टी., परवाना, पाणीपुरवठा व इस्टेट विभागाकडील १० कर्मचारी याप्रमाणे एकूण १२० कर्मचाऱ्यांची स्वतंत्रपणे नियुक्ती करण्यात आलेली आहे. यातील प्रत्येक पथकासाठी एक पथकप्रमुख नियुक्त करण्यात आला असून, प्रत्येकी स्वतंत्रपणे वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 

Story img Loader