मोहननगरातील एका १२ वर्षीय मुलीचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. शहर स्वच्छ असल्याचा महापालिकेचा दावा यानिमित्ताने फोल ठरला आहे.
याना लिओनार्ड असे मरण पावलेल्या मुलीचे नाव आहे. ती सहावीची विद्यार्थीनी होती. तिचे वडील एका कंपनीत वरिष्ठ अधिकारी असून ते मुंबईला राहतात. गेल्या काही दिवसांपूर्वी तिला ताप आला होता. त्यानंतर तिने उपचार घेतले, परंतु त्यात तिला फायदा झाला नाही. त्यामुळे तिला तीन दिवसांपूर्वी धंतोलीतील गेटवेल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात बुधवारी सकाळी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने लिओनार्ड कुटुंबीयावर दुखाचे संकट कोसळले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात संशयित डेंग्यू आजाराचे रुग्ण मोठय़ा संख्येने आढळून येत होते. विशेषत हे रुग्ण शहरातील उच्चभ्रू वस्तीतच दिसून येत होते. यानंतर महापालिकेने पंधरा वीस दिवसांपूर्वीच रक्त तपासणी मोहीम सुरू केली होती.
तसेच त्या भागात फवारणीही सुरू केली होती. याचवेळी गेल्या नऊ महिन्यात शहरात डेंग्यूने एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा महापालिका करीत होती. परंतु या मुलीच्या मृत्यूमुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या दाव्याचे धिंडवडे निघाले आहे. मोहननगरात सर्वत्र अस्वच्छता असून महापालिका त्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा