राज्यातील सर्वात कमी मानव निर्देशांक असलेल्या गडचिरोली जिल्ह्य़ातील अतिदुर्गम व आदिवासी गावांना मुख्य रस्त्यांनी जोडण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत राबविण्यात येत आहे. जिल्ह्य़ात आतापर्यंत २४५ कोटी रुपये खर्चाचे २१४ रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरणाची कामे झाल्याने २७२ गावे मुख्य रस्त्यांशी जोडली जाणार आहेत.
या योजनेमुळे भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम तसेच नक्षलवादग्रस्त गावांना बारमाही व पक्के रस्ते उपलब्ध झाल्यामुळे गावातील आजारी व्यक्तींना जलद गतीने वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यास मदतच झाली आहे, तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाणे-येणे सुद्धा सुलभ झाले आहे.
एटापल्ली तालुक्यातील बासखेडा हे असेच एक आदिवासी गाव. नाल्यामुळे या गावात जाता येत नव्हते. पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत नाल्यावर पूल बांधल्याने हे गाव मुख्य रस्त्याला जोडल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना शेतातील उत्पादित माल बाजारपेठेत नेण्याची सुविधा झाली आहे. चामोर्शी तालुक्यातील चौकालवाडा, मच्छलीटोला
ही गावे रस्त्याने जोडल्यामुळे वैद्यकीय सुविधेसोबतच शाळेतील मुला-मुलींना पुढील
शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सालईटोला या गावाला पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून पक्का रस्ता तयार झाल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी, शेतकऱ्यांना आपल्या शेतातील माल घरी आणण्यासाठी तसेच गावकऱ्यांना गडचिरोली शहरात वेळोवेळी येण्या-जाण्यासाठी बारमाही सुविधा निर्माण झाली आहे.
या योजनेअंतर्गत गडचिरोली ते माडेतुकूम, सालईटोला हा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत जून २०१२ पर्यंत पूर्ण करण्यात आला. त्यामुळे १५० घरांची वस्ती असलेल्या एक हजार लोकसंख्येच्या गावाला कायमस्वरूपी रस्ता मिळाला. नजीकच्या खरपुंडी गावातील शाळकरी मुले शाळेत जाऊ लागले. गावात चौथीपर्यंत शाळा असून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना खरपुंडी किंवा गडचिरोली मुख्यालयी तेथील विद्यार्थ्यांना ये-जा करण्याची सोय झाली आहे.
सालईटोला येथे जाण्यासाठी रस्ता नव्हता. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल असायचा. त्यामुळे गावकऱ्यांना खूप त्रास करावा लागत असे. आता या रस्त्यावरून गडचिरोली शहरांना लागणारी विटे ट्रॅक्टरद्वारे सहजपणे पोहचविता येतात. दररोज मोठय़ा प्रमाणावर विटांची तसेच रेतीची या मार्गावरून वाहतूक होत असते, अशी माहिती ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्रावण चिचघरे यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12month servise to gadchiroli distrect villages wich are faceing shortage