मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलविरोधी भूमिका घेतल्यानंतर मनसेचे कार्यकत्रे सक्रिय झाले आहेत. नवी मुंबईसह उरण व पनवेल तसेच रायगड जिल्ह्य़ात ३५ किलोमीटर अंतरात एकूण १३ टोलनाके असून ते बेकायदा असल्याने ते बंद करण्यात यावेत, अशी मागणी रायगड जिल्हा मनसे अध्यक्ष अतुल भगत यांनी केली आहे.
नवी मुंबईसह रायगड जिल्ह्य़ात आय.आर.बी. व एम.ई.पी. यांच्या माध्यमातून ही टोलवसुली केली जाते. यामध्ये रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्ग तसेच मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग ४ ब या मार्गावरून प्रवास करीत असताना वाहनांना टोल भरावा लागतो. मात्र अनेक ठिकाणी अंतर्गत रस्त्यावरून येतानाही टोल द्यावा लागत आहे. त्यामुळे काही किलोमीटरच्या अंतरासाठीही पसे मोजावे लागत आहेत. अनेक ठिकाणी बेकायदा टोलवसुली केली जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. या परिसरात सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावर टोल भरावा लागतो. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासनाने आखून दिलेल्या नियमांचेही पालन केले जात नाही.
वाशी, मुंब्रा, ऐरोली, उरण-चिल्रे, जासई (दास्तान), पनवेल, नादगांव, शेडुंग, कोन, खारपाटील, आपटा हे सर्व टोलनाके सात किलोमीटरच्या अंतरात आहेत.
सायन-पनवेल दुहेरी मार्गावर खारघर स्पॅगेटी येथे उभारल्या जाणाऱ्या टोलनाक्याविरोधात सामान्य वाहनचालकांसोबत विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनीही विरोध केला आहे.
पनवेलचे टोल अन्यायकारक आहेत. यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने लेखी पत्राद्वारे प्रथम विरोध दर्शविला आहे. खारपाडा येथील टोल १९९९ पासून सुरू आहे. सायन-पनवेल मार्गावरील टोल हासुद्धा अन्यायकारक आहे. हा टोल येथे संबंधित प्रशासनाने रद्द करावा यासाठी आम्ही लवरकच विरोध दर्शविण्यासाठी फलक लावणार आहोत. खारघर स्पॅगेटी येथे होणारा टोल मनसे होऊ देणार नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष  -अतुल चव्हाण

महागाईच्या वणव्यात याअगोदरच नागरिक होरपळून निघाले आहेत. कोकण आणि पुण्याला जाताना सायन-पनवेल मार्गाचा अवलंब हजारो वाहनांना करावा लागतो. यामुळे खारघर येथे नवीन होणारा टोलनाका हा वाहनचालकांची वाटमारी ठरणार आहे. शिवसेना ही वाटमार कदापि खपवून घेणार नाही. वाशी ते खारघर हे अंतर लक्षात घेता हा टोल कायदेशीरदृष्टय़ा अन्यायकारक आहे. त्यामुळे लवकरच संबंधित विभागाला तसे लेखी पत्राद्वारे कळवून आम्ही या टोलला प्रथमदर्शनी विरोध करू. त्यानंतरही टोल उभारण्याच्या हालचाली दिसल्यास हा टोल उभारू देणार नाही.  
शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख
-बबन पाटील

सरकारची अनेक धोरणे चुकली आहेत. अशाच उदाहरणांपैकी एक टोल हे आहे. पनवेलच्या वाहनचालकांना स्थानिक वाहनचालकांचा दर्जा देऊन त्या वाहनांकडून टोल आकारला जाऊ नये अशी शेकापची भूमिका आहे. शेकापक्षाचा विकासाला विरोध नाही. जेवढा खर्च रस्ता उभारणीसाठी येतो तो जरूर आकारावा. मात्र पनवेल येथील खारपाडा गावाजवळील आणि वडखळ येथील टोल बांधकामाची रक्कम वसूल होऊनही सूरूच आहेत. अशा अनियमिततेला शेकाप विरोध दर्शविणार आहे. खारघर येथील टोलमधून स्थानिक वाहनांना सूट न दिल्यास आम्हाला लोकहितासाठी आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल.
शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस -बाळाराम पाटील

भारतीय जनता पार्टीने याअगोदरच राज्यात भाजपा महायुतीचे सरकार आल्यास टोलमुक्त रस्ते करू असे जाहीर केले आहे. त्यामुळे नवीन टोल आकारणीला भाजपाचा संपूर्णपणे विरोध राहील. मे महिन्यापासून खारघर स्पॅगेटी येथील मार्गावर टोल आकारणीसाठी सरकारने हालचाली केल्यास भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या टोलविरोधी भूमिका मांडतील. त्यानंतरच्या सामान्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाला सरकार जबाबदार असेल.
भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष
-बाळासाहेब पाटील

चांगल्या रस्त्यांमुळे कालचा सायन-पनवेल मार्ग आज राज्य महामार्ग झाला आहे. येथील वाहतूककोंडी पूर्वीच्या तुलनेत आज अल्प प्रमाणात आहे. भविष्यात या मार्गावरील रस्ते काँक्रीटचे असावेत ही काळाची गरज आहे. मात्र टोल आकारणी नियमित असावी. संबंधित कंपनीने किती वर्षांमध्ये टोल संपेल याची तारीख टोलनाक्यावर जाहीर करावी. या टोल आणि विकासाला आरपीआयचा विरोध नाही. मात्र टोलनाक्याच्या परिसरातील १० ते १२ किलोमीटर अंतरावरील स्थानिक वाहनचालकांना ही टोलसक्ती नसावी. ही टोलसक्ती स्थानिकांच्या मुळावर उठल्यास आरपीआय या टोलला विरोध करेल.  
आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष
-जगदीश गायकवाड

Story img Loader