शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे झाडांची मोठय़ा प्रमाणात तोड सुरू असतानाच दुसरीकडे परिसरातील जंगलांना वन वणव्यांचा दाह सोसावा लागत आहे. नाशिक वन वृत्ताच्या क्षेत्रात दरवर्षी वन वणव्यांच्या सरासरी २०० हून अधिक घटना घडत असून त्यात १३०० हेक्टर क्षेत्रावरील जंगल भस्मसात होत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. वणव्यात भरडलेल्या परिसरात लाकूड, इंधन, जैव विविधतेची हानी होते. शिवाय, पाणी, जमिनीची धूप व इतर नैसर्गिक संसाधनासह वन्य प्राण्यांनाही त्याची झळ सोसावी लागत आहे.
पूर्व नाशिक, मालेगाव उपविभाग पश्चिम नाशिक, अहमदनगर आणि संगमनेर उपविभाग या परिसराचा समावेश असलेल्या नाशिक वनवृत्तात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या १३ टक्के वनक्षेत्र असून त्यातील ४७९९.२० चौरस किलोमीटर क्षेत्र वनविभागाच्या ताब्यात आहे. जंगल परिसरात फेब्रुवारी ते मे हा चार महिन्यांचा कालावधी प्रामुख्याने वन वणव्यांचा कालावधी मानला जातो. परंतु, जंगलात आग कधीही लागू शकते. या क्षेत्रातील जंगल सदाहरीत नसून पर्णरहित असल्याने वर्षभर वणव्यांचा सामना करावा लागत नसला तरी वणव्यांची संख्या बरीच मोठी असल्याचे लक्षात येते. अवैध शिकार, वनक्षेत्रावर अतिक्रमण, पाला-पाचोळा निष्काळजीपणे जाळणे तसेच सूड भावनेतून आग लावण्याचे प्रकार केले जातात. या कारणांमुळे वर्षांकाठी वन वणव्यांच्या सरासरी २०० हून अधिक घटना घडत असून त्यात सरासरी १३०० हेक्टर जंगल होरपळून निघत आहे. मागील अडीच वर्षांचा अंदाज घेतल्यास आतापर्यंत वन वणव्यांचे ५२६ प्रकार घडले. त्यात तीन हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील जंगलाची अपरिमित हानी झाली. या घटनांमध्ये जवळपास सहा लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.
निसर्ग सौंदर्याची देणगी लाभलेल्या पेठ व सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांबरोबर सिन्नर, देवळा,कळवण व नाशिक भागातील नैसर्गिक संपत्ती वनवणव्यांच्या दृष्टचक्रात सापडली आहे. या प्रकरणी ५२६ वनगुन्हे दाखल झाले असले तरी वणवा पेटविणारे मात्र अद्याप हाती लागू शकलेले नाहीत.
वन वणव्यांमागे मनुष्यनिर्मित कारणे अधिक आहेत. आगीपासून जंगलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत वन संरक्षण समित्यांवर सोपविण्यात आली आहे. वनवृत्तात सद्यस्थितीत ५०० हून अधिक समित्या कार्यरत असून त्यातील किती समित्या जंगलाचे संरक्षण करतात हा प्रश्न आहे.
बहुतेक समित्या अकार्यक्षम ठरल्याने स्थिती गंभीर बनल्याचे अधोरेखीत होत असताना वन विभाग या समित्यांच्या सहभागामुळे वनवणव्यांवर नियंत्रण आल्याचा दावा करत आहे. जंगलात आग लागल्याने होणाऱ्या नुकसानीचा आकडा काही लाखात असला तरी त्यामुळे नैसर्गिक संपत्तीची झालेली हानी कधीही न भरून निघणारी आहे.
आग प्रतिबंधक उपायांविषयी साशंकता
वन वणव्यांची समस्या नियंत्रणात रहावी म्हणून वन विभाग हंगामाच्या प्रारंभीच आग प्रतिबंधक उपायांवर भर देते. विशिष्ट वन क्षेत्राचा एक भाग तयार करून त्याभोवती ‘जाळ प्रतिबंधक रेषा’ (फायरलाईन) बनविली जाते. जंगलात ठराविक अंतर ठेऊन रिकाम्या राहणाऱ्या या रेषेच्या जागेत पाला पाचोळा राहणार नाही याची दक्षता घेतली जाते. यामुळे एका भागात वणवा पेटला तरी तो दुसऱ्या भागात पोहोचत नाही. यामुळे कमीतकमी हानी होण्यासाठी प्रयत्न केला जातो. जंगलाच्या आसपास वास्तव्यास असणाऱ्या ग्रामस्थांमध्ये जनजागृतीही केली जाते. वन संरक्षण समित्यांच्या माध्यमातून केले जाणारे हे काम प्रत्यक्षात होते की नाही, याविषयी संदिग्धता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा