गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटे-बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. मालेतील चौदावा लेख.
गाव पातळीवर सलोख्याचे वातावरण निर्माण करून आपआपसातील तंटे सोडविण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत जळगाव जिल्ह्यातील ११५१ गावे सहभागी झाली असली, तरी त्यापैकी ११३९ ठिकाणीच तंटामुक्त गाव समित्यांची स्थापना होऊ शकली आहे. १२ गावांमध्ये या समित्या अस्तित्वात येऊ शकल्या नाहीत. या मोहिमेंतर्गत एकूण १३४२ ग्रामसुरक्षा दलांची स्थापनाही करण्यात आली आहे.
राज्यात भौगोलिक वैविधतेसोबत सामाजिक विविधता असून, आर्थिक क्षेत्रातही कमी-अधिक उत्पन्नाचे सामाजिक घटक आहेत. सामाजिक, आर्थिक मागासलेपण, निरक्षरता, अज्ञान, आर्थिक व सामाजिक विषमता, बेरोजगारी यामुळे समाजात कायमस्वरुपी शांतता निर्माण होण्यास अडसर येतो आणि त्यातून भांडण-तंटय़ाचे प्रमाणही मोठे असल्याचे लक्षात येते. या पाश्र्वभूमीवर, ग्रामीण भागाच्या विकासासाठी राज्य शासनाने या मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली. गावासाठी गावातच लोकसहभागातून तत्काळ व सर्वमान्य तडजोड घडवून आणण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याची संधी यानिमित्ताने प्रत्येक गावास उपलब्ध झाली. या मोहिमेद्वारे लोकसंख्येच्या प्रमाणात तंटामुक्त ठरणाऱ्या गावांना पुरस्काराच्या स्वरूपात एक ते दहा लाख रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते.
ग्रामीण भागाच्या विकासाला नवीन परिमाण देणाऱ्या या मोहिमेत जळगाव जिल्ह्यात बहुतांश गावांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसून येते. जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, चाळीसगाव, रावेर, अमळनेर, यावल, पाचोरा, बोदवड आदी १५ तालुक्यांतील जवळपास ११५१ गावांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला आहे. या गावांपैकी १२ गावांना मात्र तंटामुक्त गाव समित्यांची स्थापना करता आली नसल्याचे अहवालावरून दिसते. वास्तविक, या मोहिमेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या ग्रामपंचायतींना १५ ते ३० ऑगस्ट या कालावधीत ग्रामसभा घेऊन निर्णय घ्यावा लागतो.
याबाबतचे पत्र व तंटामुक्त गाव समिती सदस्यांची यादी संबंधित पोलीस ठाणेप्रमुखास ग्रामपंचायतीने तत्काळ पाठविणे आवश्यक असते. उपरोक्त ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत निर्णय घेतला असला तरी त्यांनी पुढील प्रक्रिया पार पाडली नसण्याची शक्यता आहे. परिणामी, सहभागी गावांची संख्या आणि तंटामुक्त गाव समित्यांची संख्या यात तफावत निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जळगाव जिल्ह्यात २९ पोलीस ठाण्यांच्या अखत्यारीतील ही सर्व गावे आहेत. त्यातील ११३९ गावांमध्ये तंटामुक्त गाव समितीची स्थापना करण्यात आल्याचे जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अहवालात म्हटले आहे. या मोहिमेंतर्गत १३४२ ग्रामसुरक्षा दलांचीही स्थापना करण्यात आली आहे.
मागील तीन वर्षांच्या सहभागित्वाचा आढावा घेतल्यास २०१०-११ मध्ये ११४८ गावे, २०११-१२ मध्ये ११४५ तर यंदा म्हणजे २०१२-१३ मध्ये ११५१ गावे सहभागी झाल्याचे दिसून येते. म्हणजे, जळगावच्या सहभागित्वात काहीसा चढ-उतार राहिला.
यंदा केवळ जी गावे तंटामुक्त गाव समित्यांची स्थापना करू शकली नाहीत, त्यांचा सहभाग केवळ नावापुरता राहिला आहे. कारण, विहित मुदतीत या समितीची स्थापनाच न झाल्यामुळे गावातील तंटे सोडविण्याची व्यवस्था त्या त्या ठिकाणी दृष्टिपथास येऊ शकणार नाही. सहभागी झालेल्या गावांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत १३४२ ग्रामसुरक्षा दलांची स्थापना केली आहे.
दलातील सदस्यांना गणवेश व प्रशिक्षण देणे तसेच ग्रामसुरक्षा दलाची रात्रीची गस्त सुरू करणे याकडे त्यांना आता कटाक्षाने लक्ष द्यावे लागणार आहे. कारण, ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करणे हे केवळ अनुस्यूत नसून गावात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याची धुरा या दलावर राहणार आहे.
  

Story img Loader