सोलापूरजवळ बोरामणीजवळ उभारण्यात येणाऱ्या विमानतळासाठी जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांपैकी ३३ शेतकऱ्यांना १४ कोटींची नुकसानभरपाई मिळणार आहे. यासंदर्भात सोलापूरच्या दिवाणी न्यायालयाने नुकताच निकाल दिला.
विमानतळासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीशी संबंधित ३३ शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता, यात १४४ हेक्टर ८४ आर शेतजमिनीच्या नुकसान भरपाईच्या रकमेबाबत संबंधित शेतकरी व पर्ल्स अॅग्रोटेक प्रा. लि. कंपनी यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे विशेष भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण दिवाणी न्यायालयात निकाली काढण्यासाठी सादर केले होते.
या भूसंपादन प्रकरणात एकूण ३३ खाती व ७७ खातेदार व १४४ हेक्टर ८४ आर जमीन वादाचा विषय होता. या प्रकरणात शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनी १९९६ साली पर्ल्स अॅग्रोटेक प्रा. लि.कंपनीला कुलमुखत्यार पत्र करून दिल्या व सदर शेतजमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार करण्याचे अधिकार कुलमुखतार पत्राद्वारे कंपनीला देण्यात आले होते. दरम्यान, सदरच्या जमिनी शासनाने २००८ साली विमानतळाच्या प्रयोजनासाठी संपादित केल्या होत्या.
वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एजाज सय्यद यांच्यासमोर या दिवाणी दाव्याची सुनावणी होऊन त्यात सदर संपादित शेतजमिनीची संपूर्ण नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यांना अदा करावी, अशा निकाल देण्यात आला. या निकालानुसार संबंधित शेतकऱ्यांना १४ कोटींची रक्कम नुकसान भरपाईपोटी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याप्रकरणात शेतकऱ्यांच्यावतीने अॅड.विक्रमसिंह काटुळे व अॅड. सूर्यकांत सरडे यांनी बाजू मांडली. तर पर्ल्स अॅग्रोटेक कंपनीतर्फे अॅड. इंदापुरे यांनी काम पाहिले.

Story img Loader