धूळवडीच्या दिवशी नागपूर व चंद्रपूर जिल्ह्य़ांत झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. यात १० जणांचा बुडून, तर चौघांचा मोटरसायकल अपघातात मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये भद्रावतीच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या घटनांमुळे दोन्ही जिल्ह्य़ांत शोककळा पसरली आहे.
कन्हानपासून तीन किलोमीटरवरील तितरी गावाजवळ सोमवारी धूळवड साजरी करून आंघोळीसाठी नदीत उतरलेल्या चार तरुणांचा बुडून मृत्यू झाला. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. राजेश सर्वेश चव्हाण, राकेश राजू बोकडे, सागर मधुकर उमरकर (तिघेही रा. यशोधरा नगर) व अभिलाश अरविंद बार्लिगे(रा. कामठी) ही बुडालेल्या चौघांची नावे असून त्यांचे मृतदेह सापडल्याचे कन्हान पोलिसांनी सांगितले.
नागपूरचे आठ जण धूळवड सादरी करून दुपारी आंघोळीसाठी कामठीच्या साईबाबा मंदिरामागील छोटी आजनी येथील कन्हान नदीत आले. त्यांनी कपडे काढून थेट नदीच्या पात्रात उडय़ा घेतल्या. काही मिनिटातच पाचजण पाण्याबाहेर आले. मात्र, त्यातील राजेश चव्हाण, सागर उमरकर, राकेश बोकडे हे तिघे बाहेर आलेच नसल्याचे निदर्शनास येताच काठावरील पाचही जण घाबरले. त्यांनी आरडाओरड केली. काहींनी कामठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी घरच्या मंडळींना घटनेची माहिती दिली.
नागपूरच्या खलाशी लाईन भागातील अशोक नगरात राहणारे सात तरुण आंघोळीसाठी त्याच परिसरात गेले होते. त्या सातजणांनी आरडाओरड ऐकली. तिघे पाण्यातून बाहेर आलेले नसल्याचे समजताच त्या सातही तरुणांनी पाण्यात उडय़ा घेतल्या. त्यांनी बुडालेल्यांची शोधाशोध सुरू केली. त्यांच्यापैकी सहाजण पाण्याबाहेर आले. अभिलाश अरविंद बार्लिगे हा तरुण बाहेर आला नाही. त्यामुळे पुन्हा आरडाओरड झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर यांच्यासह कामठी, तसेच पोलीस निरीक्षक सुनीता मेश्राम यांच्यासह कन्हान पोलीस दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. गाडेघाटच्या जीवनरक्षा पथकाचे पुरुषोत्तम कावळे व त्यांच्या आठ सहकाऱ्यांनी कन्हान नदीच्या पात्रात उतरून बुडालेल्यांचा शोध सुरू केला. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास राजेश चव्हाण याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. अंधार झाल्यामुळे शोथकार्य थांबवावे लागले.
आज सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास पुन्हा शोधकार्य सुरू झाले. साडेअकरा वाजताच्या सुमारास राकेश बोकडे याचा मृतदेह मिळाला. त्यानंतर सायंकाळपर्यंत इतर तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. कन्हान नदीत भरपूर प्रमाणात गाळ साचला असून त्यात हे मृतदेह फसले होते, असे पोलिसांना समजले. चंद्रपूर जिल्ह्य़ात होळी व धूळवड सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात येत असताना अपघातांच्या मालिकेत दहाजणांचा मृत्यू झाला.
सोमवारी मूल येथे धूळवड साजरी केली जात असताना अक्षय अनिल खोब्रागडे (१९), सूरज रमेश रणदिवे (२७) व सागर प्रकाश वामनपल्लीवार (१९) मोटरसायकलने निघाले होते. मूलजवळील उमा नदीच्या वळणापर्यंत आले असताना विरुध्द दिशेने येणाऱ्या गणेश बबन गंधवार (३०) व अजय विठ्ठल ऐडनुत्यलवार (३७) यांच्या मोटरसायकलमध्ये जोरदार धडक झाल्याने चौघांचाही घटनास्थळीच मृत्य झाला. सागर वामनपल्लीवार गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत सागरला मूल येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला चंद्रपूर व नंतर नागपूर येथे हलविण्यात आले. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघाताची माहिती मिळताच मूलचे ठाणेदार एस.बी. ताजने तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मूलच्या रुग्णालयात आणले.
भद्रावतीजवळच चारगाव येथे वर्धा नदीच्या तीरावर पार्टी करण्यासाठी गेलेल्या डॉ. संजय राजूरकर (३२), ओंकार वघळे (३०) व शुभंम ठाकरे (३०) यांचा वर्धा नदीच्या डोहात बुडून मृत्यू झाला. भद्रावती ग्रामीण रुग्णालयातील शालेय आरोग्य तपासणी पथकातील डॉ. राजूरकर, मेडिकल स्टोअर्सचे संचालक वघळे व ठाकरे पार्टी करण्यासाठी म्हणून वर्धा नदीच्या तिरावर गेले होते. तेथे मौजमस्ती करीत असतानाच वर्धा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी उतरल्यावर ही दुर्देवी घटना घडली. जवळपास दोन तास शोध घेतल्यानंतर मृतदेह नदीच्या पात्रातून बाहेर काढण्यात यश आले. वघळे हा आईला एकटाच मुलगा होता, तर डॉ. राजूरकर यांचे येत्या ११ मे रोजी लग्न ठरले होते. या घटनेमुळे भद्रावतीवर शोककळा पसरली आहे. होळीच्या दिवशी याच ठिकाणी देऊळवाडा येथील रामा कुळमेथे (४५) याचा याच ठिकाणी बुडून मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत गोंडपिंपरी तालुक्यातील वेळवा या गावी लोकेश रंजित नूरशेट्टी (१२) व अनुराग निकेश उमक (१०) या दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला.
निकेश उमक यांच्या शेतात धूळवडीची मौजमस्ती करण्यासाठी मुलगा अनुराग व लोकेश गेले होते. यावेळी विहिरीत उतरले असता दोघांचाही बुडून मृत्यू झाला. धूळवडीच्या दिवशी १४ जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
धूळवडीला दुर्घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू
धूळवडीच्या दिवशी नागपूर व चंद्रपूर जिल्ह्य़ांत झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. यात १० जणांचा बुडून, तर चौघांचा मोटरसायकल अपघातात मृत्यू झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-03-2014 at 01:18 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 14 people death in different accident in nagpur and chandrapur on holi