शहर पोलीस दल व पुण्यातील इतर विभागातील चौदा अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशंसनीय सेवेबद्दल शुक्रवारी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाली आहेत.
पोलीस दलात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ही पदके जाहीर झाली आहेत. राज्यात एकूण ४३ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत. त्यामध्ये पुण्यातील १४ जणांचा सहभाग आहे.
यामध्ये राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डी. कनकरत्नम, शहर पोलीस मुख्यालयाचे उपायुक्त जयंत नाईकनवरे, मोटार परिवहन पोलीस अधीक्षक किशोर जोशी, वायरलेस विभागाचे पोलीस अधीक्षक ईश्वर कांबळे, रेल्वे सुरक्षा विभागाचे सहायक सुरक्षा आयुक्त विनोद कुमार राय, खडकी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रकाश घार्गे, गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस उपअधीक्षक कालिदास सूर्यवंशी, स्वारगेट  पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राम पठारे, रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेंद्र रोकडे, वायरलेसचे फौजदार अब्दुल रहिम अब्दुल करीम शेख, कोथरूड पोलीस ठाण्याचे सहायक
पोलीस फौजदार  हिरामण बागुल, महादेव कदम गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सिद्धार्थ लोखंडे, दीपक गहेरवार यांचा समावेश आहे.
कनकरत्नम हे १९८७ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी राज्यात मुंबई, ठाणे, कोल्हापूर, नागपूर, अमरावती या ठिकाणी काम केले आहे. अधीक्षक कांबळे हे अभियंत्याची नोकरी सोडून १९९१ मध्ये पोलीस दलात रूजू झाले. त्यांनी मुंबई येथे २००६ साली झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोटात बिनतारी संदेश यंत्रणेत उत्तमप्रकारे मार्गदर्शन करून सेवा कार्यरत ठेवली.
सहायक आयुक्त घार्गे यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांविरुद्ध झालेल्या मोहिमेत सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहिले. सूर्यवंशी हे १९८३ मध्ये फौजदार म्हणून पोलीस दलात रूजू झाले. त्यांनी बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर या ठिकाणी काम केले. त्याच बरोबर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, शहर पोलीस दलात काम केले आहे.

Story img Loader