शाळेचे विद्यार्थी घेऊन अंबाजोगाईकडे येणाऱ्या स्कूल बसचा रॉड तुटल्याने बस उलटून १४ विद्यार्थी जखमी झाले. मिनी बसमध्ये परवानगीपेक्षा जास्तीचे विद्यार्थी नेहमी आणले जातात. या अपघातामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या मिनी बस, ऑटोबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अंबाजोगाईच्या गुरुवार पेठ भागात फातेमा गर्ल्स स्कूलच्या विद्यार्थ्यांना शहराजवळील १० किलोमीटर अंतरावरून दररोज बसने आणले जाते. बुधवारी सुगाव येथील १६ विद्यार्थ्यांना घेऊन बस (एमएच २३ ४०८०) अंबाजोगाईस निघाली. मात्र, भरधाव वेगात अंबा सहकारी साखर कारखान्याजवळ बसचा स्टेअरिंग रॉड तुटला आणि चालकाचा ताबा सुटला. परिणामी रस्त्याकडेला झाडावर बस आदळून उलटली.
या अपघातात सुगावचे १४ विद्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना तत्काळ स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Story img Loader