वाशीम जिल्ह्य़ातील १४ गावे पूरग्रस्त क्षेत्रात असून ११७ गावे संभाव्य पूरग्रस्तांच्या यादीत आहे. जिल्ह्य़ात अतिवृष्टीने काही आपत्ती आल्यास जिल्ह्य़ातील आपत्कालीन यंत्रणा सज्ज असल्याची माहिती या विभागाचे प्रमुख बाळासाहेब बोराडे यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा, तालुका व संबंधित विभाग स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. यात पाटबंधारे विभाग, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस दल, जिल्हा परिषद प्रशासनाचा समावेश करण्यात आला आहे. पोलीस ठाण्याचे शहरी व ग्रामीण पथक, जिल्हा आरोग्य विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत वितरण कंपनी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, जिल्हा महिती अधिकारी कार्यालयात आपत्कालीन स्थितीबाबत नियंत्रण कक्ष उघडण्यात आले आहेत. तसेच तालुका स्तरावर शोध आणि बचाव पथक कार्यान्वित करण्यात आले असून या पथकात ३० जणांचा समावेश आहे. गावपातळीवर ११ जणांचे पथक तयार असून त्यांना शासनाकडून आलेले बचावाचे साहित्य देण्यात आले आहे. पूर परिस्थितीत जे लोक पूर रेषेमध्ये राहत असतील त्यांना त्वरित स्थलांतरित करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले असल्याची माहिती बोराडे यांनी दिली.
जी गावे पूरग्रस्त, पूरप्रवण आहेत त्या सर्व गावांमध्ये तात्पुरते निवारे ठरवून दिले आहेत. त्यात गावातील शाळा, समाज मंदिरे, धर्मशाळांचा समावेश आहे. हवामान खात्यातर्फे देण्यात येणारे अतिवृष्टीचे इशारे, धोक्याच्या सूचना त्वरित देण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागासह नियंत्रण कक्षाला देण्यात आल्या आहेत. पूर परिस्थितीत मोठय़ा प्रमाणात जनावरांची हानी होते. अशा ठिकाणी पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांना मोफत औषधांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, तसेच जनतेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा हिवताप अधिकारी यांनीही पीडितांसाठी उपचारासह औषधांची सुविधा देण्याचे आदेश प्रशासनाकडून दिले आहेत. पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त भागात वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याच्या सूचनाही प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्य़ातील जी गावे पुराने वेढणारी आहेत त्या गावात तीन महिने पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा प्रशासनाकडून देण्यात आला असून जिल्ह्य़ात आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास जिल्ह्य़ातील अनेक सेवाभावी संस्था, कारंजा (लाड) येथील सर्वधर्म आपत्कालीन पथक, वाशीम येथील छत्रपती बहुउद्देशीय तरुण मित्रमंडळ यांचे कार्यकर्ते सज्ज असल्याचा दावा बाळासाहेब बोराडे यांनी केला आहे. जिल्ह्य़ात सोमवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने बुधवारी पहाटे विश्रांती घेतली. गेल्या २४ तासात जिल्ह्य़ात सरासरी ४६.५० मि.मी. पाऊस झाला, तर १ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्य़ात सरासरी ४५९.५० मि.मी. एवढा पाऊस झाला.
वाशीममध्ये १४ गावे पूरग्रस्त क्षेत्रात, आपत्कालीन यंत्रणा सज्ज
वाशीम जिल्ह्य़ातील १४ गावे पूरग्रस्त क्षेत्रात असून ११७ गावे संभाव्य पूरग्रस्तांच्या यादीत आहे. जिल्ह्य़ात अतिवृष्टीने काही आपत्ती आल्यास जिल्ह्य़ातील आपत्कालीन यंत्रणा सज्ज असल्याची माहिती या विभागाचे प्रमुख बाळासाहेब बोराडे यांनी दिली. जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा, तालुका व संबंधित विभाग स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.
First published on: 29-06-2013 at 01:31 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 14 villages in the flood affected areas washim emergency system ready