देशाच्या विविध भागांतील शेतकऱ्यांकडून दिवसाला १ कोटी ३० लाख लिटर दूध संकलित करून त्यापासून विविध खाद्यपदार्थ बनवणाऱ्या ‘अमुल’ने ठाणे जिल्ह्य़ातील विरार येथे १४० कोटींच्या भव्य अशा प्रकल्पाची निर्मिती केली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागांतील शेतकऱ्यांकडून दिवसाला १० लाख लिटर दूध जमा केले जाणार आहे, अशी माहिती ‘अमुल’ने उच्चपदस्थ अधिकारी डॉ. रत्नम आणि सुंदरन यांनी ठाणे येथे दिली. येथील ‘आय.पी.एच’ संस्थेच्या वतीने आयोजित ‘वेध’ परिषदेत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
ठाणे जिल्हय़ात स्थानिक डेअरी नाही. परंतु या भागात दुधाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होते. नेमकी हीच गोष्ट ध्यानात ठेवून ‘अमुल’च्या वतीने या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. गुजरातच्या धर्तीवर निर्माण करण्यात आलेला हा प्रकल्प येत्या महिन्याभरात सुरू होणार आहे. गुजरातमधील प्रकल्पात दूध संकलन करताना शेतकऱ्यांना जेवढा मोबदला दिला जातो, तेवढाच मोबदला महराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार असल्याचे ‘अमुल’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या विरोधात ‘अमुल’ची चळवळ सुरू झाली होती. १९४२ मध्ये अमूलकडून दिवसाला २५० लिटर दूध संकलित केले जायचे. आज भव्य अशा स्वरूपात उभ्या राहिलेल्या ‘अमुल’ कडून दिवसाला १ कोटी ३० लाख लिटर दुधाचे संकलन केले जाते, अशी माहितीही उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.
देशाच्या विविध भागांत अमुलचे ५० हून अधिक प्रकल्प आहेत. अमुल ही एक चळवळ असून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेली संस्था आहे. तसेच अमुलचा खरा मालक हा शेतकरीच आहे, असे अमुलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांबरोबर काम करताना त्यांचा उत्कर्ष कसा होईल या गोष्टीला प्रथम प्राधान्य दिले जाते. त्यांच्याशी वारंवार चर्चा करून त्यांच्या गरजा लक्षात घेतल्या जातात. मागील ३० वर्षांत अमुलचा झालेला विस्तार शेतकऱ्यांमुळेच आहे, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader