पोलिसांचा चोवीस तास बंदोबस्त असल्याचा दावा केला जात असताना शहरातील सहा विभागांत गेल्या पाच वर्षांत ६ हजार २५५ अपघात झाले असून त्यात १ हजार ४३३ नागरिक ठार झाले. त्यातील ७७४ अपघात शहराच्या रिंगरोडवर झाले, त्यात १२५ नागरिक ठार झाले.
१ जानेवारी २०१० ते ३१ डिसेंबर २०१४ या कालावधीत शहरातील सहा विभागांत किती अपघात झाले व त्यात किती नागरिक ठार झाले, त्यात रिंग रोडवरील अपघातात किती नागरिक ठार झाले, अपघाताची स्थळे कोणती, याची माहिती अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात मागितली होती. त्यातून त्यांना ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली. पूर्व वाहतूक शाखेच्या हद्दीत गेल्या पाच वषार्र्त १३८७ अपघात झाले. त्यात २८७ नागरिक ठार झाले. रिंगरोडवर ३९४ अपघात झाले असले तरी त्यात एकही मृत्यू झाला नाही. अपघातात तीन पोलिस ठार झाले. या विभागात मेडिकल चौक ते अजनी रेल्वे ब्रिज, म्हाळगीनगर चौक ते बेसा चौक व बेसा चौक ते चामट चक्की चौक, रामेश्वरी ते संघर्षनगर, चामट चक्की चौक ते दिघोरी नाका ही अपघातांची स्थळे आहेत.
पश्चिम वाहतूक शाखेच्या हद्दीत १०७९ अपघात झाले असून त्यात २६८ नागरिक मृत्यूमुखी पडले. २०१० मध्ये झालेल्या २४३ अपघातांत ५२ मृत्यू, २०११ मध्ये झालेल्या १९६ अपघातांत ४३ मृत्यू, २०१२ मध्ये झालेल्या १७९ अपघातांत ५१ मृत्यू, २०१३ मधील २३१ अपघातात ५४ तर २०१४ मध्ये झालेल्या २३० अपघातांत ६८ नागरिक ठार झाले. रिंगरोडवर ६८ अपघात झाले असून त्यात ३० जणांना प्राणास मुकावे लागले.
पश्चिम शाखेत मानकापूर चौक, नवीन काटोल नाका, एल.आय.सी. चौक, कोराडी कॉलनी गेट क्र. २ ही अपघातप्रवण स्थळे आहेत. उत्तर विभागात ७१६ अपघात झाले असून त्यात १३५ नागरिकांचा मृत्यू झाला. २०१२ मध्ये झालेल्या एका अपघातात एका पोलिसाचा बळी गेला. या भागात टेलिफोन एक्सचेंज चौक, महावीर चौक, वैष्णवदेवी चौक आणि जाधव चौक ही अपघातप्रवण स्थळे आहेत.
दक्षिण वाहतूक शाखेच्या हद्दीत गेल्या पाच वषार्ंत ९७२ अपघात झाले असून त्यात १७४ नागरिकांना आपले प्राण मगवावे लागले. खापरी नाका, अजनी चौक, महाराजबाग चौक, चिचभवन पूल आणि सोमलवाडा चौक हे या शाखेतील अपघात स्थळे आहेत. इंदोरा शाखेच्या हद्दीत १२५२ अपघात झाले. त्यात ३२३ नागरिक मृत्युमुखी पडले. तर रिंग रोडवर २०३ अपघात झाले.
त्यात ८२ नागरिकांचे बळी गेले. इंदोरा शाखेच्या हद्दीत जुना पारडी नाका चौक, पारडी येथील हनुमान मंदिर परिसर व प्रकाश हायस्कूल, मारुती शो-रुम, जरीपटका रिंगरोड चौक, ही अपघातप्रवण स्थळे आहेत. एमआयडीसी वाहतूक शाखेच्या हद्दीत गेल्या पाच वर्षांत एकूण ८४९ अपघात झाले असून त्यात २४६ नागरिकांचा बळी गेला.
२०१० मध्ये झालेल्या २१८ अपघातात ५०, २०११ मधील १६२ अपघातात ४५, २०१२ मधील १४२ अपघातात ३३, २०१३ मधील १५७ अपघातात ६७ आणि २०१४ मध्ये झालेल्या १७० अपघातात ५१ नागरिक मृत्युमुखी पडले. याच शाखेच्या हद्दीतील रिंगरोडवर १०० अपघात झाले तर त्यात १२ नागरिकांचे मृत्यू झाले. दाभा टी पॉईंट, वाडी बाजार, खडगाव टी पॉईंट, आठवा मैल डिफेन्स गेट, वडधामना, एमआयडीसी टी पॉईंट, सीआरपीएफ गेट टी पॉईंट, वानाडोंगरी टोल नाका, ही या शाखेच्या हद्दीतील अपघातप्रवण स्थळे आहेत.
शहरात पाच वर्षांत अपघातांत १,४३३ नागरिक ठार
पोलिसांचा चोवीस तास बंदोबस्त असल्याचा दावा केला जात असताना शहरातील सहा विभागांत गेल्या पाच वर्षांत ६ हजार २५५ अपघात झाले असून त्यात १ हजार ४३३ नागरिक ठार झाले.
First published on: 11-02-2015 at 08:28 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1443 people died in road accident in nagpur