आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेऊन गावी परत निघालेल्या भाविकांची बस वडदपाटी शिवारात उलटून झालेल्या अपघातात १५ भाविक जखमी झाले. यातील दोघांना हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अकलूज (जिल्हा सोलापूर) आगाराची पंढरपूर-अमरावती ही बस (एमएच १४ एपी २७९२) पंढरपूरहून सुमारे ४५ भाविकांना घेऊन हिंगोली बसस्थानकातून सोमवारी पहाटे वडदपाटी शिवारात आली. याच वेळी स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला व रस्त्यावरील फलकाला धडक देऊन बस एका खदानीत उलटली. या अपघातात १५ भाविक जखमी झाले. जखमींपैकी अरविंद केशव देशमुख (वय ५५, खुपसा, तालुका अकोट, जिल्हा अकोला) व सुनीता नीलेश झरे (वय २५, गोपाळनगर, अमरावती) हे दोघांना प्रकृती अत्यवस्थ झाल्याने हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच वडद येथील नागरिक जगन मुटकुळे, राम गायकवाड यांच्यासह बसचे वाहक पी. डी. पुडाने, चालक विठ्ठल काटे यांनी घटनास्थळी धाव घेत बसच्या खिडक्यांच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढले.

Story img Loader