शहरातील अशोक चौकाजवळ व्हिव्हको प्रोसेससमोर रात्री मोटारसायकलवरून मुलासमवेत जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील १५ तोळे सोन्याचे दागिने दोन चोरटय़ांनी बळजबरीने हिसका मारून पळवून नेल्याचा गुन्हा जेलरोड पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे. शहरात ‘धूम’स्टाईलने महिलांच्या अंगावरील दागिने लुटण्याचे प्रकार वरचेवर वाढत असल्याने पोलीस यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
मीनाक्षी मधुकर अल्ले (वय ४५, रा. न्यू पाच्छा पेठ) या गृहिणी रात्री पावणेदहाच्या सुमारास आपला मुलगा ओमप्रकाश याच्यासह मोटारसायकलवरून अशोक चौकातून घराकडे जात असताना व्हिव्हको प्रोसेससमोरील रस्त्यावर पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरटय़ांनी मीनाक्षी अल्ले यांच्या गळ्यातील चपळाहार, गंठण व मंगळसूत्र असे १५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने काही क्षणातच हिसका मारून लंपास केले. रात्री रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ कमी होत असताना किंवा जुळे सोलापूरसारख्या कमी वर्दळीच्या ठिकाणी महिलांना गाठून त्यांच्या गळ्यातील दागिने लुटण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. मोटारसायकलवरून ‘धूम’स्टाईलने येणाऱ्या चोरटय़ांचा बंदोबस्त करण्यास पोलिसांची यंत्रणा कमी पडत असल्यामुळे ‘धूम’ टोळी सक्रिय झाल्याचे महिला वर्गातून सांगितले जाते.

Story img Loader