उत्तर नागपूर
पक्षाच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांची जबरदस्त नाराजी, बसपचा तगडा उमेदवार आणि डॉ. मिलिंद माने यांची प्रतिमा यामुळे तब्बल १५ वर्षे सत्ता गाजविणारे काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत यांना मानहानीकारक पराभव पत्कारावा लागला आणि अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उत्तर नागपुरात भाजपला पुन्हा एकदा कमळ फुलवण्याची संधी चालून आली.
डॉ. नितीन राऊत यांनी गेल्या पंधरा वर्षांत कोटय़वधी रुपयांची विकास कामे केल्याचा प्रचार केला. परंतु त्यांचा लाभ मिळाला नाही. उलट कोटय़वधी रुपये खर्च झाले तर विकास का दिसत नाही, असा सवाल मतदारांकडून होऊ लागला होता. यामुळे ज्या विकासाच्या बळावर राऊत यांना तारले जाऊ असा विश्वास होता, तो खरा ठरला नाही. मतदारांमधील या प्रस्थापितविरोधी आगीत तेल ओतण्याचे काम त्यांच्याच पक्षातील वरिष्ठ कार्यकत्यांनी केला. गेल्या काही वर्षांपासून उत्तर नागपूर विकास आघाडी या नावाने संघटना स्थापन करून राऊत यांच्या विरोधात प्रचार करण्यात येत होता. या आघाडीत काँग्रेसचे जुने कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांमध्ये पक्षात आपल्याला डावलण्यात येत आहे. राऊत आपल्या मुलास प्रोमोट करीत आहेत. आपले राजकीय कॅरिअर संपवले जात आहे, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती. यामुळेच काँग्रेसला येथे लोकसभेत देखील आघाडी घेता आली नव्हती.
दुसरीकडे बसपने माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना उमेदवारी दिल्याने येथील मतदारांना पर्याय मिळाला होता. येथे बसपचे कॅडर आहे. त्यामुळे गजभिये अनुसूचित जातींबरोबरच बहुजन आणि अल्पसंख्याक समाज यांच्यापर्यंत पोहचले. त्याचा परिणाम असा झाला की, बसपचा आलेख जबरदस्त उंचावला आणि त्यांना दुसऱ्या क्रमांची मते मिळाली.
डॉ. मिलिंद माने यांनी नगरसेवक म्हणून केलेले कार्य, त्यांची प्रतिमा आणि भाजपचा परंपरागत मतदार आदी बाबींमुळे भाजपला उत्तर नागपुरात यश मिळाले आहे. काही बौद्ध मत आपल्याला मिळणार नाहीत याची कल्पना माने यांना होती. अशा ठिकाणी त्यांनी मला मत नका देऊ पण गजभिये साहेबांना द्या, असा छुपा प्रचार केला. यामुळे ज्या बौद्ध मंडळींना भाजप आवडत नाही आणि त्यांना काँग्रेसला पण मत द्यायचे नाही, अशा मतदारांना गजभियेंचा पर्याय अधिक योग्य वाटला आणि बौद्ध मतांचे विभाजन झाले. त्याचा लाभ साहजिकच डॉ. माने यांना झाला. दुसरीकडे सत्तेसोबत राहण्याचे कसब असलेला सिंधी आणि पंजाबी समाजाने केंद्रात भाजप सत्तेत आहे आणि राज्यात भाजपच्या बाजूने वातावरण आहे हे ओळखून बाजू बदलली आणि मानेंना पाठिंबा दिला. हा मतदार या निवडणुकीआधी राऊत यांच्या सोबत राहिला होता.
या निवडणुकीचे आखणी वैशिष्टय़े म्हणजे मुस्लीम मतदार काही प्रमाणात बहुजन समाज पक्ष आणि भाजपकडे वळला. या घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे भाजपला उत्तर नागपुरात पुन्हा एकदा ताब्यात घेण्यात यश आले आहे. भाजपने १९९५ मध्ये भोला बधेल यांच्या स्वरुपात ही जागा जिंकली होती.

Story img Loader