स्वामी विवेकानंद यांचे १५० वे जयंती वर्ष येत्या १२ जानेवारी २०१३ पासून पुढील वर्षभर स्वामी विवेकानंद सार्ध शती समितीच्या माध्यमातून साजरे केले जाणार आहे. या निमित्ताने विवेकानंदांचा स्फूर्तिदायी संदेश या निमित्ताने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न समितीतर्फे केला जाईल, अशी माहिती समितीच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष शिवशंकरभाऊ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘भारत जागो, विश्व जगाओ’ या संकल्पनेवर आधारित अनेक कार्यक्रम व उपक्रम या वर्षभरात केले जातील. स्वामी विवेकानंदांचे हे जयंती वर्ष केवळ भारतातच नव्हे, तर जगभर साजरे केले जाणार आहे. याच पाश्र्वभूमीवर स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समितीच्या देशातील सर्व राज्यांमध्ये प्रांत समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, आध्यात्मिक गुरू, स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे प्रसारक आणि देशभरातील अनेक संस्था-संघटनांचे अनुभवी कार्यकर्ते या समितीत सहभागी होत आहेत. अमृतानंदमयी यांनी या समितीचे अध्यक्षपद भूषविण्याचे मान्य केले असून देशाचे माजी निवडणूक आयुक्त डॉ. सुभाष कश्यप या समितीचे मानद अध्यक्ष असतील, असेही पाटील यांनी सांगितले.
पाच प्रमुख सामाजिक पैलूंवर लक्ष कें द्रित करून समितीने देशभरात विविध कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात युवा शक्ती जागृत करणारे युवा संमेलने, सर्व सामाजिक क्षेत्रात महिलांचा व्यापक सहभाग घेऊन विकासात्मक कार्यक्रम, देशाच्या प्रगतीतील ग्रामीण भारताच्या सहभागाचा सन्मान करणे आणि गावांच्या एकात्मिक विकासासाठी मदत करणे, देशातील स्थानिक जनजातींनी जपलेल्या संस्कृती आणि श्रध्देचा सन्मान करून त्यांचे संरक्षण, संवर्धन आणि प्रसार करणे, समाजातील बुध्दिजिवी आणि अभिजन समाजाचा देशाच्या जडणघडणीत असलेला सहभाग वाढविणे, प्रबुध्द वर्गातील मान्यवर मंडळींची चर्चासत्रे देशातील प्रमुख महानगरांमध्ये आयोजित करणे, या पाच पैलूंवर वर्षभर मंथन करण्यात येणार आहे.
यानिमित्त १२ जानेवारी २०१३ रोजी समितीतर्फे देशातील सर्व प्रमुख शहरे आणि गावांमध्ये शोभायात्रा काढण्यात येणार आहे. १८ फेब्रुवारी २०१३ रोजी देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सामूहिक सूर्यनमस्कार या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे आयोजन देशभरातील किमान ३००० गावांमध्ये करण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्रात किमान ५०० गावे असतील. स्वामीजींच्या सुप्रसिध्द शिकागो भाषणाचा स्मृतिदिवस म्हणून ११ सप्टेंबर २०१३ रोजी युवकांच्या विशाल सहभागासह ‘भारत जागो दौड’ घेण्यात येणार आहे. विवेकानंदांच्या अंतरंगाचे दर्शन सर्वसामान्यांपासून बुध्दिजिवींपर्यंत व्हावे, यासाठी त्यांच्या विचारांचे आणि साहित्याचे प्रकाशन होणार आहे. १५० पुस्तके अल्पदरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. हा जन्मशताब्दी उत्सव भारतासह विदेशातही साजरा होणार आहे. ११ सप्टेंबर रोजी विवेकानंदांच्या ऐतिहासिक भाषण झालेल्या स्थळीही शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ३० ते ३५ देशांमध्ये असे कार्यक्रम होणार आहेत.

Story img Loader