श्रीगोंदे तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्वाच्या काष्टी ग्रामंपचायतीच्या १७ जांगासाठी तब्बल १५४ अर्ज दाखल करण्यात आले. याशिवाय तालुक्यातील एकुण ५ ग्रामपंचायतीसाठी ३६६ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
श्रीगोंदे तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचे उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज मोठी गर्दी झाली होती.
जिल्हयाचे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या स्वत:च्या काष्टी गावातील ग्रामंपचांयतीची निवडणूक असल्याने त्याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पाचपुते प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठठलराव काकडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिपक भोसले, व भाजप महिला अघाडीच्या तालुकाध्यक्ष सुवर्णा पाचपुते हे तिघे याच गावात राहतात. त्यामुळे चुरस मोठी आहे. तालुक्यातील पाचपुते-कुंडलीकराव जगताप राजकीय संघर्ष व प्रचंड संख्येने आलेले उमेदवारी अर्ज पहाता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दिसत नाही. मात्र कोणते दोन गट एकत्र येतात हेच येथे महत्वाचे आहे. तालुक्यातील दुसरी मोठी बेलंवडी स्टेशन ग्रामंपचायतीच्या निवडणुकीतही जिल्हा परिषद सदस्य अण्णा शेलार व दिलीप रासकर यांच्या गटात चुरस आहे. तालुक्यात काष्टी १५४, बेलवंडी स्टेशन ८६, माठ ३२, पारगाव सुद्रिक ६२, तांदळी दुमाला ३२ असे अर्ज भरण्यात आले आहेत.